डॉ. लिंग विरुद्ध डॉ. स्टिंग

(एका थरारक सामन्याची चित्तरकथा) - डॉ. रवींद्र शिवदे

आटपाट नगर होते. त्याचे नाव 'भीड'. हे ऐतिहासिक नगर अश्रुबिंदू नावाच्या नदीच्या कुशीत मोठ्या मोक्याच्या ठिकाणी वसलेले होते. महाराष्ट्राचे हृदय म्हणजे मराठवाडा, आणि मराठवाड्याचे हृदय म्हणजे भीड‍. अशा या हृदयस्थ जिल्ह्यात अनेक हृदयद्रावक व हृदय कंपित करणार्‍या घटना घडल्या. त्याचीच ही चित्तरकथा‍!

नावाप्रमाणेच 'भीड' शहर व जिल्हयातील भीड कलेकलेने वाढत चालली होती. त्याला कारण ही तसेच जबरे होते. भीड हा मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांप्रमाणे मजुरीप्रधान जिल्हा‍! वर्षाचे आठ महिने मजुरीसाठी वणवण भटकायचे व चातुर्मासात स्वगृही येऊन गृहकृत्ये पार पाडायची अशी भीडकरांची प्रथा होती. ही 'गृहकृत्ये' ते इतक्या उत्साहाने पार पाडीत की पुढील चातुर्मासापर्यंत भीडच्या लोकसंख्येत लक्षणीय भर पडलेली दिसे. त्यातून मराठवाडा ही संतांची भूमी‍! त्यामुळे 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा,' हे संतवचन लोकांच्या तोंडी नेहमी असे. अर्थात, पुत्रच व्हावा, व तो गुंडगिरीत प्रवीण व्हावा, अशी सर्व भीडकरांची मनोमन इच्छा असे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' हे आणखी एक संतवचन देखील त्यांच्या अंगवळणी पडले होते. त्याप्रमाणे ते चातुर्मासात भरपूर अंगमेहनत करीत, व ती फळास येऊन भीड जिल्ह्यात 'गुंड्यां' चे उदंड पीक येत असे. भीडकरांचा आनंद गगनात मावेनासा होई. पण या आनंदावर विरजण टाकणारी एकच गोष्ट घडे. ती म्हणजे 'गुंड्यां' च्या या पिकाबरोबर लेकी बाळींचे तण देखील तेवढेच माजे. आणि हे त्रासदायक तण कुणालाच नको होते‍‍!

पीक तर हवे, पण स्वास्थ्य आणि संपत्तीची हानी करणारे हे तण मुळीच नको‍ अशी समस्त भीडकरांची मनोकामना होती. सर्वसामान्य भारतीय शेतकर्‍यांची हीच भावना असते. पिकाची हानी न करता तण मात्र मुळातच निपटून काढील असे प्रभावी तणनाशक त्यांना सापडत नव्हते. ते उपलब्ध करून देणारा मसीहा लवकरच अवतीर्ण झाला. भीडच्या वैद्यकीय क्षितिजावर उगवलेल्या या तेजस्वी तार्‍याचे नाव ' डॉ. सद्दाम गुंडे'!

'सद्दाम' या युगपुरुषाचे नाव मोठ्या हौसेने आईवडीलांनी आपल्या बाळास ठेवले, व त्यास शोभेलशी कामगिरीही डॉ. गुंडे यांनी करून दाखविली. कठोर तपस्या करून त्यांनी एक दिव्य चक्षु प्राप्त करून घेतला. बीज अंकुरण्याच्या आधीच ते या दिव्य चक्षुने त्याचे परीक्षण करीत व सांगत- या बीजातून काय निघणार? पीक की तण, गुंडा की कळशी‍! ऊस तोडणी कामगारांना ते त्यांच्या लोकभाषेतच उपदेश करीत व ज्ञान सोपे करून सांगत- दांडकं की बांडीन, पाट की चारी, गूळ की साखर‍! साहजिकच त्यांच्या या दैवी शक्तीची वार्ता वायूवेगाने पसरली. कमळ उमलले की त्याचा सुगंध आपोआप पसरतो व भुंगे गोळा होतात. केवळ मराठवाडा व महाराष्ट्रच काय, गुजरातचे मगनलाल, छगनलाल देखील ' दिकरा की दिकरी' याचा छडा लावण्यासाठी त्यांच्या दर्शनास येऊ लागले, व त्यांना अपार धनराशी अर्पण करू लागले. पीक व तण यातील लिंगभेद अचूक वर्तवण्याच्या त्यांच्या सिद्धीमुळे त्यांच्या मूळ नावाचा लोकांना विसर पडला, व 'डॉ. लिंग' हेच नाव जनमानसात रूढ झाले. दर्शनार्थींची जत्रा त्यांच्या दारी रोजच भरत असे. त्यामुळे लवकरच संपूर्ण गावाचे तीर्थक्षेत्रात रुपांतर झाले.

धाव घेई माझे जीवा। जावे 'लिंगा' चिया गावा ।।
दिवा वंशाचा पेटवा । पणती हळूच विझवा ।।

अशा अभंगांतून डॉ. लिंग यांचे गोडवे गाईले जाऊ लागले. त्यांच्या सुविद्य पत्नीचाही या धर्मकार्यात मोलाचा सहभाग असे. अनेक लोक त्यांना साक्षात् सरस्वतीचा अवतार मानीत.

पण सत्पुरुषांची सत्वपरीक्षा पाहण्याचा मोह विधात्याला आवरत नाही. व त्यासाठी तो काही खलपुरुषांचीही योजना करतो. ' कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ' असे म्हणतात ते काही खोटे नाही. वैद्यकीय क्षेत्रातल्या एका बांधवालाच डॉ. लिंग यांचे हे वैभव काट्याप्रमाणे सलू लागले. त्याचे नाव डॉ.शल्यराज. पण वृश्चिकाप्रमाणे दंश करण्याच्या त्याच्या घातक प्रवृत्तीमुळे तो डॉ. स्टिंग या नावाने ओळखला जातो‍!

महाभारतातला शल्य हा जसा सत्ताधारी कौरवांच्या पक्षात होता, तसाच शल्यराज देखील शासकीय सेवेत होता. अल्पमोलाची शासकीय चाकरी करणार्‍या शल्यराजाचा जळफळाट शेवटी इतका वाढला की सोबत बराच फौजफाटा घेऊन तो निघाला व त्याने डॉ. लिंग यांच्या पवित्र आश्रमावरच धाड घातली‍! त्याच्या फौजफाट्यात एका असंतुष्ट आत्म्याचीही भर पडली होती.. शिवाजी महाराजांना जशी विजापूरची बडी साहेबीण पाण्यात पहात असे, तशीच सातारची एक वकील साहेबीण डॉ. लिंग यांना पाण्यात पहात असे. पण डॉ. लिंग डगमगले नाहीत. त्यांनी शत्रुपक्षाला चालून येऊ दिले, व अशा अडचणीच्या जागी त्याची कोंडी केली की यँव‍! डॉ. स्टिंगला त्यांनी एका स्नानगृहातच कोंडून घातले‍! बैस बेट्या आंघोळ करीत! अखेर दाती तृण धरून डॉ. स्टिंग शरण आला व गयावया करू लागला तेव्हां मोठ्या उदार मनाने दयाबुद्धी दाखवून त्यांनी स्टिंगला सोडून दिले.

पण इथेच घोडचूक झाली. डॉ.स्टिंग महंमद घोरी प्रमाणे उलटला‍! सरळ सामन्यात आपली डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर त्याने कपटनीतीचा आश्रय घ्यायचे ठरवले. त्यासाठी वकील साहेबीणीने एका मायावी महिलेची योजना केली.

आणि घात झाला! त्या मायावी महिलेच्या मोहजालात डॉ. लिंग फसले. सिंह सापळ्यात अडकला की कोल्ह्यांना जसा जोर चढतो तशी वृत्तपत्रांनी आपली कोल्हेकुई सुरू केली, की डॉ. लिंग आता संपले‍! पण सत्पुरुष असे संपत नसतात. डॉ. लिंग मोठ्या शिताफीने स्टिंगच्या सापळ्यातून निसटले व सगळ्या फौजफाट्याच्या हातावर तुरी देऊन अंतर्धान पावले. स्टिंग सिद्दी जौहरप्रमाणे हात चोळत बसला!

(गुप्त वेशात निसटलेले डॉ. लिंग सध्या कुठे आहेत या विषयी अफवांना ऊत आला आहे. तर्‍हे तर्‍हेचे तर्क वितर्क लढविले जातात आहेत. काहींच्या मते त्यांनी नानासाहेब पेशव्यांप्रमाणे नेपाळमध्ये आश्रय घेतला आहे. तर काही जण छातीठोकपणे सांगतात की ते साधूंच्या अखाड्यात सामील झाले असून पुढच्या सिंहस्थात शाही स्नानाच्या वेळी आपल्याला भेटतील. अशा सर्व शंका कुशंकांना तिलांजली देण्यासाठी VOICE ने आपला खास वार्ताहर 'भूपाल' याची नेमणूक केली. 'नक्कीरन' चा गोपाल ज्याप्रमाणे वीरप्पनला भेटत असे त्याप्रमाणे 'भूपाल' ने ही जिवावर उदार होऊन डॉ. लिंग यांचा ठावठिकाणा शोधला आहे, व त्यांचा एक्स्क्लुझिव्ह इंटरव्ह्यू देखील घेतला आहे. तो आमच्या प्रिय वाचकांसाठी सादर करीत आहोत.)

(पडदा उघडतो तेव्हां डोळे बांधलेला भूपाल प्रवेश करतो.)
भूपाल- अल् जझीरा, अल् जझीरा!
डॉ. लिंग- परवली? परवली?
भूपाल- परली‍! परली!
डॉ. लिंग- गुड, दॅटस् द वर्ड! वेलकम भूपाल‍! वेलकम टू द लँड ऑफ गोल्डन सँड- दुबई‍‍!
भूपाल- (डोळ्यावरची पट्टी काढतो) सलाम‍! या अरब वेशात मी तुम्हाला ओळखलेच नाही.
डॉ. लिंग- अरे देश तसा वेश! आणि ओळखणार कसं? मी प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आहे.
(आतून एक बुरखाधारी स्त्री प्रवेश करते)
स्त्री- अल् खरूज‍़, अल् खरूज़
डॉ. लिंग- अगं कशाला उगीच घसा खरवडतेस, हा आपला मराठी माणूस आहे.
स्त्री- सेफ?
डॉ. लिंग- अगदी सेफ. अल् जझीरा नं त्याची गॅरंटी घेतलीय.
भूपाल- नमस्कार वहिनी! कसं वाटतय दुबई!
सौ. लिंग- कसलं काय वाटणार? आमच्या मराठवाड्यापेक्षा ड्राय एरिया आहे.
डॉ. लिंग- अगं थोडी कळ काढ, परवापर्यंत. दाउदभाईंचा पाहुणचार संपला की आपण थेट बँकाकलाच जाणार आहोत- राजनभाऊकडे.
सौ. लिंग- तर काय. तुमच्या त्या शासनाच्या कौरवांनी आम्हाला असा वनवास भोगायला लावलाय.
डॉ. लिंग- पण लवकरच आम्ही ग्रॅंड कमबॅक करणार आहोत. कारण लोकांना आमची सेवा हवी आहे. आमचा भरवसा राजाश्रयावर नाही, लोकाश्रयावर आहे.
भूपाल- बरोबर आहे. तुमच्या विद्येला लोकाश्रय आहे तोपर्यंत अजिबात मरण नाही. आणि समजा तुम्ही नसलात तरी एखादा सवाई लिंग तिकडे तयार होईलच.
डॉ. लिंग- व्हायलाच हवा. ही लोकांची गरज आहे. आणि आपल्या प्राचीन संस्कृतीची शिकवण देखील आहे. पूत नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र. म्हणूनच एकाही धर्ममार्तंडाने कधी आमच्याविरूद्ध ब्र देखील काढला नाही.
सौ. लिंग- करेक्ट! अष्टकन्या सौभाग्यवती भव असा आशीर्वाद आहे का आपल्यात?
भूपाल- तुम्ही भारतीय संस्कृतीची नस बरोबर ओळखली आहे. यू हॅव अ ब्राईट फ्यूचर! पण हे सरकार हात धुऊन तुमच्या पाठीमागे लागलंय त्याचं काय?
डॉ. लिंग- अहो, होळीची बोंब तीन दिवस असते. पब्लिक मेमरी इज शॉर्ट. मागेही आम्ही असा ब्रेक घेतला होता. थोडं थंड झालं की पुन्हा आमचा उद्योग सुरू करू! न निश्चितार्थात् विरमन्ति धीराः!
भूपाल- दॅट्स् द स्पिरिट! पण तुमची ती सनद वगैरे रद्द केली त्याचं काय... आणि त्या कोर्ट केसेस वगैरे..
(दोघेही हसतात)
डॉ. लिंग- अहो खुळे की काय तुम्ही? साहेबच सांगून गेलाय 'There is no person in India, who can not be bought if the price is high enough'
भूपाल- खरंय! And no expense is high for you! पण तूर्तास तरी ही सक्तीची सुटी घेणं भाग आहे. बरं, सद्या वेळ कसा घालवता?
डॉ. लिंग- मजेत! हॉरर मुव्हीजची मला आवड आहेच. दिवसभर मी सी. ड्या. पहात बसतो.
सौ. लिंग- मी देखील. 'ओमेन' मधला तो सैतानी कुत्र्यांचा सीन मला फार आवडतो.
भूपाल- अरे हो‍! तुमचे ते कुत्रे सद्या फार चर्चेत आहेत, त्यांच्याविषयी काही सांगा ना.
डॉ. लिंग- ती एक गंमतच आहे. काय झालं, मला शेतीची फार आवड. शंभर एकर शेतीत मी फक्त सेंद्रीय खतं वापरीत असे. काय सुंदर बाग फुलली होती. पण काय झालं, माझ्या नतद्रष्ट शत्रूंनी शेतात पुरलेली सेंद्रीय खतं पुरावे म्हणून उकरून काढायला सुरूवात केली. म्हणून मग बायो मेडिकल वेस्ट च्या डिस्पोजलसाठी ही श्वानपथकाची कल्पना मला सुचली. एकदम क्लीन डिस्पोजल.
भूपाल- व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया, नाहीतर ती घंटागाडी, आणि त्या रंगीबेरंगी पिशव्या- घोळ नुसता.
डॉ. लिंग- आमचे चारी कुत्रे- मीझो, प्रोस्टो, फॉली ऑणि कॅथी, या सर्वांचा हिला इतका लळा आहे म्हणून सांगू‍‍!
सौ. लिंग- (डोळ्यांचा कडा ओलावतात)
भूपाल- डोन्ट वरी! सून ऑल ऑफ यू विल बी युनायटेड. येतो मी, भेट दिल्याबद्दल तुमचे किती आणि कसे आभार मानू?
डॉ. लिंग- इट्स् ओ. के. तुम्हीही त्या चाळीस हजारच्या बक्षीसावर लाथ मारलीत की‍! आणि जीव धोक्यात घालून गुप्तपणे आम्हाला भेटलात.
भूपाल- चाळीस हजार, पी नट्स् ! अहो तुमच्या इंटरव्ह्यूची पब्लिसिटी व्हॅल्यू VOICE साठी करोडो रुपयांची आहे!
(सर्वजण हसत असतानाच- पडदा)