माझ्या आयुष्यातील सर्वात लहान १६ तास

‘टूर ऑफ द ड्रॅगन’- भुतान डेथ रेस- एक अनुभव

- डॉ. हितेंद्र महाजन

साधारण गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील गोष्ट. ऑपरेशन थिएटर मध्ये डॉ. गणोरकर सरांसोबत सायकलीं बाबत चर्चा चालू होती व त्यांनी मला 'टूर ऑफ द ड्रॅगन' रेस बद्दल विचारले. मला काहीही माहीत नव्हते. मी काहीच बोललो नाही, पण भुंगा वळवळायला लागला होता. नुकताच 'मनाली-लेह-खारदुंगला' हा जगातील सर्वात उंचावरील रस्ता सहज रित्या सायकलीवर पार केला होता. उत्साह अगदी शिगेवर होता. लागलीच घरी गेलो व नेटवर 'टूर ऑफ द ड्रॅगन, भुतान ' असे शोधायला लागलो. जी माहिती समोर आली ती वाचून ही एक अत्यंत खडतर रेस आहे व याचा आपण एकदा तरी अनुभव घेतलाच पाहिजे हे मनाशी ठरवून टाकले. प्रथम माहितीत एवढेच कळाले की ही एक जगातील सर्वात अवघड अशी रेस आहे. यात आपल्याला २६८ कि.मी. अंतर चार खिंडी पार करुन एका दिवसात पूर्ण करावे लागते. ही रेस भुतान ऑलिम्पिक कमिटी आयोजित करते व दर वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या शनिवारी घेतली जाते. रेस ला नुकतीच दोन वर्षे झाली होती व पहिल्या रेस मध्ये भुतानच्या राजाने भाग घेऊन ती वेळेत पूर्ण केली होती. हे वाचून अजूनच स्फूर्ती चढली व पुढील वर्षी या रेस मध्ये भाग घ्यायचे मनाशी ठरवून टाकले. त्या प्रमाणे भुतान ऑलिम्पिक कमिटीला व दोन ते तीन ट्रॅवल एजंट्स् ना जनरल रेस मध्ये भाग घेण्याचे व पुढील माहिती काढण्याचे E-mai l टाकून सांगून ठेवले.लागलीच तेन्झींग नावाच्या 'भुतान ज्वेल ट्रॅवल एजंट' चा मेल आला व त्यात पुढील वर्षीच्या रेसची माहिती देण्याचे आश्वासन मिळाले. पुढील ३-४ महिने मुंबई मॅरॅथॉनची तयारी व त्या स्पर्धेत भाग घेणे यात गेले.

साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा तेंन्झींगचा मेल आला. त्यात तिने  3rdरेसची घोषणा झाल्याचे व रजिस्ट्रेशन ओपन झाल्याचे कळविले. तिच्या प्रोफेशनालिझम चे मला कौतुक वाटले. तिने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये प्रॉमिस केल्या प्रमाणे लक्षात ठेवून बरोबर मला हवी असलेली माहिती दिली. मी लागलीच आमच्या सर्व सायकलिस्ट मित्रांना विचारण्यास सुरुवात केल्यावर लक्षात आले की हा वेडेपणा मला व माझ्या लहान भावालाच (डॉ. महेंद्र महाजन) करावा लागणार. रेस मध्ये भाग घ्यावयाची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामुळे शेवटी दोघे भाऊ तर दोघेच रेसला जायचे ठरवून टाकले व भुतान ज्वेल च्या तेंन्झींग ट्रॅवल एजंटच्या मदतीने रजिस्ट्रेशन चे सर्व सोपस्कार e- mail व्दारा पार पाडले. प्रत्येक मेल मध्ये तेंन्झींगचे एक वाक्य कायम असायचे ते म्हणजे, 'Doctor, I hope you have gone through the details about this race'. ह्या वाक्याचा खरा अर्थ रेससाठी भुतान मध्ये पोहचल्यावर उलगडला. तो पर्यंत असे वाटायचे की आपण खारदुंगला पास सायकलवर सर केलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही.

हे सर्व करता करता १५ मे उगवला व सायकलीच्या सरावास सुरुवात झाली. माझे  कॅल्क्यूलेशन पुढील प्रमाणे होते- ते असे की ही रेस २६८ कि.मी. ची आहे व ती हिमालयातील साधारण ३४०० मी. उंचीवर असून त्यात आपल्याला चार पास पार करावयाचे आहेत. म्हणजेच आपण इथे ६०० मी. उंचीवर असतांना एका दमात ३०० कि.मी. अंतर तरी सायकलिंग करायला पाहिजे. आपलीProfessional Practice  सांभाळून ३०० कि.मी. सायकल चालवायची म्हणजे ते फक्त रविवारीच शक्य होते. हातात मे महिन्यातील २, जुन व जुलै मधील ८ व ऑगस्ट मधील ३ असे एकूण १३ रविवार होते. ऑगस्ट मधील शेवटचे दोन रविवार रिकव्हरी साठी सोडले होते. त्यात १३ पैकी मला माहीत होते की २-३ रविवार Professional Practice मुळे म्हणा किंवा घरगुती कारणांमुळे सोडावे लागणार होते. म्हणजेच एकुण ८ रविवार ३०० कि.मी च्या सायकलिंगच्या practice साठी मिळणार होते. शिवाय आठवड्यात २-३ वेळेस सकाळी अंजनेरीच्या पाय-या पर्यंतचा घाट चढून परत, असे ६० कि.मी. चे सायकलिंग करायचे ठरविले.

त्या प्रमाणे आमची सायकल प्रॅक्टिस सुरु झाली. सर्व रस्त्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की मुंबई रस्ता हा सर्वात चांगला आहे. कारण तो मोठा आहे, सरळ आहे. त्यात कसारा घाट व इतर बरेच चढउतार आहेत. सतत phone connectivity असते व काही बरे वाईट घडलेच तर लवकर मदत मिळू शकते. असा विचार करुन आम्हा दोघा भावांची सायकलवर  दर रविवारी मुंबई वारी सुरु झाली. सकाळी पाच वाजता LED light लावून निघायचो, परत यायला संध्याकाळचे सहा ते सात वाजायचे. सुरवातीला शहापूरला जाऊन परत यायचो. नंतर ठाण्या पर्यंत जाऊन यायला लागलो. पहिल्या रविवारी २५० कि.मी. साठी तेरा तास लागले. हळू हळू तेरा तासात २५० ते ३०० कि. मी. होऊ लागले. तसा तसा आमचा आत्मविश्‍वास ही वाढू लागला. मध्येच एकदा क्रिकेट मॅचसाठी मुंबईला जायचे ठरले. मुलांसाठी मॅच सोडवेना व सायकल प्रॅक्टिसचा रविवार ही घालवता येत नव्हता म्हणून थेट वानखेडे स्टेडियम सायकलवर गाठले. रस्त्यातील बरेच धाबेवाले ओळखीचे झाले होते. आमच्या मध्ये अंतर पडले तरी ते सांगायचे ' तुमचा भाऊ एक तासापूर्वीच पुढे गेला ' व एकमेकांचे निरोप द्यायचे. एका रविवारी तर महेंद्रची सायकल ५ वेळा पंक्चर झाली. त्या दिवशी पंक्चर जोडायचा व सायकलीचे ट्यूब बदलण्याचा दांडगा अनुभव आला व आपण पक्के सायकलवाले झाल्याचा भास झाला. पहिल्या पावसात फारच मजा वाटली पण नंतर सतत मुसळधार पावसात इगतपुरी भागात सायकल चालवायचा कंटाळा येऊ लागला. संध्याकाळी घरी येईपर्यंत नखशिखांत चिखलाने माखलेले असायचो. सायकलला problem येऊ नये म्हणून तसेच थकलेल्या अवस्थेत सायकल धुणे व ऑईल देणे अपरिहार्य असायचे. जुलै महिन्यात आमचे सायकलिंगचे कपडे, बूट, सॅक व सायकल मला तरी सुकल्याचे आठवत नाही. कारण परत अंजनेरीला जायचे म्हटले की पाऊस असायचाच. अंजनेरीच्या गावक-यांना पण आमची सवय झाली होती. सुरवातीला अंजनेरीला जाऊन यायला लागणारा ३ तास हा वेळ आम्ही २ तास १० मिनिटांवर आणला होता.

हाताशी तीन रविवार राहिले असतांना न घडावे ते घडले. कसारा घाटाच्या सुरुवातीच्या गतिरोधकावर मी तोल सांभाळू शकलो नाही व जोरात आपटलो. उजव्या गुडघ्याला तीन टाके पडले व थोडे हाताला खरचटले. नेहेते सरांनी जखमेचा चांगला समाचार घेतला होता म्हणून चिंता नव्हती पण पुढील दोन रविवार सायकलिंग प्रॅक्टिसला मुकावे लागले. तेव्हां पासून आम्ही knee elbow guard  सुध्दा घालायला लागलो. शेवटी सायकलिंग ही आपली हॉबी असून प्रोफेशन नव्हे हे विसरुन चालणार नव्हते. सेफ्टी फर्स्ट हे कायम मनाशी घट्ट बांधून ठेवले होते.

सोबत वाचन पण जोरात चालू होते.  C.P. Tips   Lance Armstrong चे ट्रेनिंग शेड्यूल वाचले. वाचनाचा खूप फायदा झाला. cadence सारख्या शब्दांचा अर्थ उलगडला. Long distance endurance  साठी diet planning चे महत्त्व समजले. आपल्या स्नायूंतून stored glycogen कसे सांभाळावे व त्यांना fresh glucose  चा पुरवठा कसा ठेवावा याबद्दल कळाले. आपला lactate intolerance काय व आपल्या muscle ला fatty acid उर्जेसाठी वापरण्यास कसे ट्रेन करावे या बद्दल कळाले. हे सर्व वाचल्यावर आतपर्यंत आपण बैला सारखी सायकल चालवायचो याची प्रचिती झाली. वरील अभ्यासाचा सायकल सरावात वापर करायला लागल्या पासून सायकलिंग बद्दल उत्सुकता व आत्मविश्‍वास वाढत होता.

सोबत सर्व तयारीची खबरबात मित्रांना देत असल्यामुळे त्यांची सर्वांची उत्साहवर्धक साथ लाभतच होती. माझ्याबद्दल म्हणायचे तर माझ्या सोबत काम करणा-या सर्व सर्जनचे पण मला मोलाचे साह्य लाभले. माझ्या सायकल practice साठी ते surgery च्या वेळा adjust  करायला लागले.

रेस मध्ये १४ ते १७ तास सायकलिंग करावी लागणार होती. त्या प्रमाणे आम्ही सरावांचे तंत्र अवलंबले होते. आम्हांला दोन गोष्टींसाठी सराव करावयाचा होता. एक म्हणजे सतत १६ ते १७ तास सायकलीवर बसण्याचा व दुसरे म्हणजे न थकता सतत सायकल चालवत राहण्याचा. आपल्या स्नायूंना अशा पध्दतीने वापरणे जेणे करुन ते कुठल्याही स्टेजला पूर्ण exhaust होता कामा नये. म्हणजे त्यांना सतत glucose   carbohydrates  चा सप्लाय देणे गरजेचे होते. असे केल्याने muscle मधील stored glycogen चा वापर करावा लागत नव्हता. एकदा का stored glycogen संपले तर ती उणीव भरायला दोन आठवडे लागतात म्हणजे त्याला आम्ही hitting the wall effect  म्हणतो. म्हणजे पुढील सायकलिंग अशक्य व रेस सोडावी लागणार. असे होऊ नये म्हणून सायकलिंग करतांना diet planning  फार महत्वाचे होते. आम्ही ड्रायफ्रूट, चॉकलेट आणिG.U. Energy Gel चा वापर करायचा ठरवला. शिवाय त्याची कंबरेच्या पाउच मध्ये ठेवण्याची अशी व्यवस्था केली की आम्हाला सायकल चालवतांना पण ते खाता आले पाहिजे. शिवाय तितकेच महत्वाचे होते ते म्हणजे water and electrolyte balance सांभाळणे. सरासरी आम्हांला ४०० ते ५०० मि.लि. पाणी तासाला लागणार होते व तेही शक्यतो with electrolytes. म्हणजे १६ तासात ८ लिटर पाणी पिणे गरजेचे होते. मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे कमी पाण्यामुळे किडनीला होणा-या damage ची कल्पना होती व त्यामुळे जास्त भीती वाटायची. कधी कधी म्हणतात ना, अज्ञानात सुख असते. पण आमच्या बाबतीत माहीत नाही, त्याचा आम्हाला फायदाच होणार होता, की नुकसान.

अजून एक महत्वाचा निर्णय म्हणजे सायकलींचा होता. आम्हाला नक्कीच आमची स्वत:ची,आम्ही जिच्यावर सराव केला अशी सायकल रेस मध्ये चालवायला आवडली असती पण यात प्रमुख एक अडचण होती आणि ती म्हणजे सायकल भुतानला घेऊन जाण्याची. भुतानला आपण फक्त त्यांच्या सरकारी Druk Airways  नेच जाऊ शकतो. त्यांचे पारो तील एकमेव airport लहान व डोंगरात असल्यामुळे दुस-या कुठल्याही विमानाला भुतान मध्ये येण्यास मज्जाव आहे. त्यात त्यांची विमाने लहान असल्यामुळे प्रत्येक प्रवासात फक्त २० किलो वजन आणण्याची मुभा होती. त्यात cabin लगेज पण आले. आणि प्रत्येक जास्तीच्या वजनासाठी त्यांचे दर फारच महाग होते. म्हणजे रु. ५५००/- प्रत्येक किलो  वजनासाठी चा दर पाहून आम्हाला झटकाच बसला. कारण सायकल व बॅग धरुन ३० किलो च्या आत आमचे प्रत्येकी सामान झाले नसते व वरील १० किलो साठी आम्हाला रु. ५५०००/- मोजावे लागणार होते. म्हणून आम्ही भुतान मध्येच दहा हजार देऊन जुनी सायकल भाड्याने घ्यायचे ठरवले.

शेवटी २३ ऑगस्ट उगवला. आमचा जाण्याचा दिवस. शेवटपर्यंत professional काम संपण्याचे नाव घेत नव्हते. जाण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तसेच रेस मधील performance चे दडपण पण जाणवायला लागले होते. गेल्या ४ महिन्यात कुठल्याही रविवारी घरच्यांना कुठे फिरायला म्हणून नेऊ शकलो नव्हतो. सारखीच सायकलिंग, पण अंजना, ओम व दिव्या कुणाचीच तक्रार नव्हती म्हणून मनात कुठेतरी आपण selfish असल्याची भावना पण खात होती. मित्रांचे best of luck चे फोन सतत येत होते. शरद पाटील सर, शिरीष, व आनंदा तर १२ वाजता ऐन कामाच्या वेळेत बस स्टँडवरच निरोप द्यायला आले. अंजना होतीच, बसमध्ये बसतांना सर्वांच्या डोळ्यात आपल्याकडून असलेल्या अपेक्षा सरळ दिसत होत्या. चिमुकल्या ओम व दिव्याने करुन ठेवलेले best of luck चे व Pappa, we love you चे कार्ड सोबत घेऊन मी व महेंद्रने सर्वांचा निरोप घेतला.  

सायकल नसतांनाही कसेबसे आमचे सामनाचे वजन प्रत्येकी २० किलो झाले होतेच. २४ तारखेला सकाळी १० वाजता आमचे विमान Paro airport वर उतरण्याची सूचना झाली. खिडकीतून बाहेर आजूबाजूचे विलोभनीय दृष्य पाहून मनाला बरे वाटले. विमान उतरतांना पंख डोंगराला टेकतील की काय अशी भीती सुध्दा वाटून गेली. पण सराईत वैमानिकाने आम्हांला सुखरुप उतरवले. विमानतळ छोटेसेच पण टुमदार, खास भुतानी शैलीचे. चालतच सर्व immigration चे सोपस्कार संपवून बाहेर आलो. ठरल्या प्रमाणे आम्हाला घ्यायला tour guide Mr. Chimmi Wangchuk Driver Namgyal, Hyundai ची Santafe गाडी घेऊन आमची वाट पहातच होते.

ओळख करुन घेण्याची औपचारिकता पार पाडून आमचा प्रवास भुतानची राजधानी थिम्पुच्या दिशेने सुरु झाला. हिमालयाची आपल्याला सवय असल्यामुळे, आपण भारताच्या बाहेर आहोत असे वाटत नव्हते. असे वाटायचे की आपण सिक्कीम मध्येच फिरत आहोत़ पण आजूबाजूला असलेली स्वच्छता, कमी माणसे, कमी वस्ती, वेगळे बांधकाम व लोकांचा वेगळा पेहेराव भुतानची जाणीव करून देण्यास पुरे होता.

       प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी पहिला दिवस आराम करण्याचे ठरवले. दुस-या दिवशी म्हणजे २५ ऑगस्टला सकाळी १० वाजता Bhutan Olympic Committee  ची सर्व स्पर्धकांसाठी भुतान Olympic Association च्या office  मध्ये मीटींग होती. आम्हाला त्या मीटींग ची फारच उत्सुकता होती. कारण तिथे सर्व competitors भेटणार होते शिवाय ब-याच शंकाचे आम्हाला निरसन करुन घ्यावयाचे होते. ठरल्या प्रमाणे आम्ही मीटींगला पोहोचलो. सर्व Bhutan Olympic Association चे सदस्य तरुण होते व तिथे कुठल्याही politics चा वास येत नव्हता. त्यात सेक्रटरी सोडला तर सर्व पदाधिकारी काहीना काही खेळांचे खेळाडू होते हे विशेष. मीटींग मध्ये आम्हाला रेस च्या रूट चे डिटेल्स देण्यात आले. इतर सर्व competitors खूपच fit वाटत होते. बरेच जण आमच्याकडे कुतुहलाने पहात होते. कारण म्हणजे, आम्ही एकतर व्यवसायाने डॉक्टर,त्यात सख्खे भाऊ व महाराष्ट्र म्हणजे सपाट भागातून आलेलो. ही तिसरी रेस असल्यामुळे काही जण या आधी पण त्यात भाग घेतलेले होते. मीटींग च्या दरम्यान उत्साह होताच पण बाकी सर्वांना पाहून व रूट बद्दल माहिती मिळाल्यावर ’’ये मै किधर आ गया  यार’’ असे वाटल्या वाचून राहिले नाही. थोडी धडधड पण जाणवायला लागली होती.

       दुपारची वेळ आम्ही तेथील महत्त्वाची monastery (local भाषेत zong) पहाण्यात घालवली. अतिशय सुंदर वास्तू. आमचा guide आम्हांला सर्व माहिती देण्याचा जिवापाड प्रयत्न करत होता. आम्ही पण त्याच्यावर या ना त्या प्रश्‍नांचा भडिमार करत होतो. तो तितक्याच शांतपणे आमच्या शंकाचे निरसन करत होता.त्याची बोलण्याची कला, त्याला त्याच्या देशाबद्दल असलेली माहिती व इतिहासाचे ज्ञान पाहून आम्ही थक्क झालो. कुठे ही तो उडवाउडवीचे उत्तर देतो आहे असे वाटत नव्हते.

       थोडक्यात भुतान बद्दल सांगतो. आपल्या शेजारी असलेला हा छोटासा देश फारच सुंदर व स्वच्छ आहे. अवघी ७ लाख लोकसंख्या असलेला हा देश पूर्ण डोंगराळ भागात आहे. तेथील जनता अतिशय प्रेमळ असून नेहमी मदतीस तत्पर अशी आहे. बहुतेक लोकांना इंग्लिश व हिंदी समजते. सर्वांना राजा विषयी अतिशय प्रेम व आदर आहे. राजा पण तसाच लोकांशी मिसळणारा व लोकांच्या खुशी साठी झटणारा. स्वत:च्या पॉवर चा कुठलाही लोभ न ठेवता लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी political government उभे केले व राजेशाही, लोकशाही व धर्मशाही ची सुंदर घडी घालून दिली. प्रत्येक भुतानी नागरिक स्वत:हून सर्व नियम पाळतो. प्रत्येक व्यक्ती त्यांचा पारंपारिक पोषाख, घालण्यास अवघड असतांना सुध्दा नियमाचा मान ठेवत आवडीने घालते. पुरुषांच्या पोशाखाला गो व स्त्रियांच्या पोशाखाला किया म्हणतात. धार्मिक ठिकाणी जातांना व सर्व सरकारी कचेर्‍यात  जातांना अंगा भवती शाल गुंडाळतात. tourist  पाहुण्यांचे आदरातिथ्य ठेवण्यात नेहमी पुढे असतात. GDP  पेक्षा Gross Happiness Index ला जास्त महत्व देण्याचा त्यांना अट्टाहास असतो. देशाची constitution adopt  करण्याआधी तेथील राजा ती घेऊन सर्व देशात फिरला व सर्वांचे मत घेऊन आणि त्याप्रमाणे हवे ते बदल करुनच ती accept  केली.corruption  कुठे ही नाही. अगदी सायकल चालवायला helmet  घालणे गरजेचे. अशा या सुंदर देशाला आपण नक्कीच एकदा तरी भेट दिली पाहीजे. मी याला country of 3 M म्हणून संबोधतो,Mountain, Monasteries आणि Monks.

२६ ऑगस्ट हा दिवस आम्ही सायकली तपासण्यात घालवायचे ठरविले. त्या प्रमाणे ठरलेल्या दुकानात गेलो. आमच्यासाठी ठेवलेल्या सायकली पाहिल्यावर धडकी भरली व स्वत:च्या सायकलींची आठवण झाली. सायकलींसाठी बरेच काही करावे लागणार याची जाणीव झाली. एवढा खर्च केलेला असतांना अजून थोडा म्हणून तिथेच सायकलला ४ नवीन टायर व ट्यूब टाकायचे ठरवले. आम्ही नेलेले handle bar, seat cover   bottle holder  बसवले. आता थोडीफार का होईना सायकल आमच्या मनासारखी करुन घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी जुनी भाडयाची ती अशीच असणार असे मनाचे समाधान करुन घेतले. मनात एक सहज विचार आला की समजा सायकलला काही झाले जे की दुरुस्त करण्याच्या पलिकडे आहे, तर मग ही सगळी मेहनत पाण्यात जाणार. आणि अशा परिस्थितीत जर आयोजकांना पटले तर सायकल बदलण्याची मुभा होती. म्हणून दोघा भावांमध्ये अजून एक  सायकल भाड्याने घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे अजून खर्च वाढला. म्हणतात ना, ’आ बैल मुझे मार’, म्हणजे असेच होणार. शेवटी सर्व मनासारखे करून घेतल्याची खात्री करुन आम्ही सायकली ताब्यात घेतल्या.

       २७ ऑगस्ट थिम्पु सोडून आमच्या रेस च्या स्टार्टिंग पॉईंट म्हणजे , जिल्हा भुमतांग कडे जाण्यास निघालो. लवकर उंचीची सवय व्हावी म्हणून आम्ही ३ दिवस रोज २ तास सायकलिंग करायचे ठरवले. त्या प्रमाणे आमच्या हॉटेल वरुन मी व महेंद्र सायकलवर निघालो. त्या दिवशी आम्ही २४ कि.मी. चा Dochula pass  चढलो. चढायला १ तास ४० मिनिटे लागली. महेंद्र १ तास ३० मि. त च चढला. बराच दम लागला कारण ८०० मी. ची चढाई होती. Dochula pass मध्ये सोबत आणलेला prayer flag बांधला व आमच्या यशासाठी प्रार्थना केली. prayer flagला बौद्ध धर्मामध्ये फार महत्व. रंगबेरंगी असंख्य flag मुळे Dochula फारच सुंदर दिसत होता. शिवाय तिथे २०८ स्तुपांचे (chorten) सुंदर बांधकाम केलेले आहे. पूजा झाल्यावर उतरायला सुरवात केली. सरळ २००० मी. चा ४६ की.मी. चा उतार संपता संपत नव्हाता. ब्रेक लावून लावून हाताला मुंग्या येण्याची वेळ आली. शेवटी  गाव आले. येथून आम्हाला मुक्कामाला जायचे होते. आज पार केलेला चढ व उतार बघून धडकी भरायला झाली. कारण हाच चढ आम्हाला रेसच्या दिवशी चढायचा होता व तो ही शेवटच्या टप्पयात म्हणजे आम्ही पार थकलेलो असतांना.

दुपारच्या जेवणानंतर Punakha Valley चे दर्शन घेतले. सुंदर असा Punakha Dzong पाहिला. या ठिकाणीच १ वर्षापूर्वी सध्या असलेल्या ५ व्या राजाचा लग्नाचा सोहळा पार पडला होता. शिवायfertility temple पाहिले. ज्यांना मुले होत नाहीत अशी जोडपी इथे येऊन प्रार्थना करतात. त्या ठिकाणी सर्व गावात, घरांना व हॉटेल मध्ये सुध्दा चक्क लाकडाचे वेगवेगळ्या साईज मध्ये Male Phallus करून ठेवलेले होते. सर्व काही रमणीय असतांना मन काही लागत नव्हते. रेसचा रूट सारखा मनात डोकावायचा. रुमवर येताच परत रूट वाचला. त्याला आमच्या पद्धतीत graphical form  मध्ये convert  केले व सर्व गावांची नावे लिहिली. कुठल्या गावाला कुठला feed zone आहे व कुठे ambulance असणार याची मांडणी केली. हळू हळू गावांच्या नावांची ओळख व्हायला लागली. त्यांनी दिलेल्या वेळात त्या त्या टप्प्यात पोहचायला काय करावे लागणार याची आखणी करायला लागलो.

       २८ ऑगस्ट! आजचा आमचा मुक्काम Phobhjika Valley मध्ये होता. रस्त्यात Pelelaनावाचा दुसरा पास पहायला मिळणार होता. जातांना ठरल्या प्रमाणे २ तास सायकलिंग केले. रस्ता फारच खराब होता. जागोजागी बुलडोझर landslide ची माती काढत होते. चिखल होता,सायकल चालवतांना दमछाक होत होती. कसे बसे १ तास ३० मिनिटे सायकल चालवल्यावर थांबायचे ठरवले. आम्हाला रेस च्या आधी थकायचे नव्हते. Muscles stiff  होऊ नयेत व रस्त्याची ओळख व्हावी हाच ह्या सायकलिंगचा हेतू. चढ व रस्त्याची परिस्थिती पाहून अजूनच खचायला झाले.  Phobhjika Valley फारच सुंदर होती. Phobjhika Valley चे वैशिष्टय म्हणजे तिथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी च्या दरम्यान येणारे Black Neck Crane पक्षी. त्यांचे थवेच्या थवे सायबेरियातून इथे येतात. पक्षांना अडथळा नको म्हणून येथील सर्व विजेच्या तारा जमीनीतून नेण्यात आल्या आहेत. Black Neck  पक्ष्यांना take off   landing साठी विमाना सारखी खूप जागा लागते. म्हणून उंच बांधकामास मज्जाव आहे. व विशेष म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी तेथील जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. एवढेच काय तर तेथील लोकांनी पक्ष्यांच्या प्रेमा पोटी TV  ला पण रामराम ठोकलाय.

२९ ऑगस्ट. Phobhjika Valley  २८०० मी. वर व Pelela pass  ३४०० मी. आज आम्ही इथूनचPelela पर्यंत सायकलिंग केले. बरीच दमछाक झाली. पेलेला पास वर पोहचायला १ तास लागला सायकली गाडीला लावून आम्ही उतरण्यास सुरवात केली. Trongsa,  जे की आमच्या आजच्या मुक्कामाचे ठिकाण होते, तेथपर्यंत ६२ कि.मी. चा सरळ उतार होता. पण हा उतार आम्हांला रेसच्या दरम्यान चढायचा होता. म्हणून आमचे सर्व लक्ष निरीक्षणात होते. रस्याची परिस्थिती वgradient कडे आमचे विशेष लक्ष होते. सुरवातीचे २० कि.मी. सोडले तर पुढील ४० कि.मी. ला फार gradient  नव्हता. हे पाहून जरा बरे वाटले. Trongsa ला संध्याकाळी तेथील बौध्द धर्माचा व भुतानचा इतिहास दर्शवणारे संग्राहलय पाहिले व तेथील Dzong पाहिले.  हे भुतानच्या मध्यभागी असल्यामुळे त्याल विशेष महत्त्व. पूर्वीचा भारतातून व म्यानमार देशातून तिबेटला जाणारा trade root  इथून जायचा व त्यामुळे येथील राजाला octroi  च्या रुपाने भरपूर पैसा मिळायचा. पेलेला पास ची चढाई सायकलवर थोडी जमण्यासारखी वाटल्यामुळे थोडा आत्मविश्‍वास आला होता. त्या दिवशी रात्री ब-यापैकी झोप लागली.

३० ऑगस्ट सकाळी नाष्टा करुन गाडीनेच आम्ही जाकर, जिल्हा भुमतांग येथे पोहचलो. हाच आमच्या रेसचा starting point होता. Trongsa  हून येतांना योतांगला पास ची पहाणी केली. हा पास आम्ही अंधारातच चढणार होतो. शिवाय इथे अजून एक छोटासा किकीला पास आम्हांला चढायचा होता. येतांना पूर्ण रस्त्याचे जमेल तेवढे निरीक्षण केले व नोंदी करुन ठेवल्या. आजचा दिवस विशेष, कारण आज दुपारी ४ वाजता भुतानच्या prince सोबत आमची मीटींग होती.prince म्हणजे सध्याच्या राजाचा लहान भाऊ. तो स्वतः सायकलिस्ट. त्याने सुध्दा ही रेस वेळेत पूर्ण केली असल्यामुळे त्याच्या प्रती आमचा आदर वाढला व त्याला भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. उशीर नको म्हणून आम्ही ३.३० लाच जाकर च्या राजवाड्यात पोहचलो. इतर स्पर्धक येत होतेच. विशेष म्हणजे इथे सर्व ४५ स्पर्धक भेटणार होते. 

मीटींगच्या ठिकाणी पोहचल्यावर आमच्या अपेक्षे प्रमाणे काहीही नव्हते. अगदी साध्या आसनांची व्यवस्था केलेली होती. शिवाय prince ला बसायला थोडेसे वेगळे आसन. सिक्युरीटी च्या नावाखाली फक्त एक bodyguard. आधी BOC चे ऑफिशियल आले व त्यांनी औपचारिक पध्दतीने मीटींगला सुरवात केली. तेवढयात एक सुंदर असा २०-२२ वर्षाचा युवक आत आला व सर्वांशी हस्तांदोलन करुन बोलू लागला. त्याने साधाच गो, म्हणजेच लोकल भुतानी पेहराव घातलेला होता. पायात स्पोर्ट शूज होते व पायाला चिखल लागलेला होता. हाच prince आहे ह्याच्यावर माझा विश्‍वासच बसेना. इतका साधेपणा आपल्याकडच्या ऑफिसर कडे पण नसतो. अर्ध्याच्या वर स्पर्धक त्याच्या ओळखीचे होते. त्यांच्याशी चर्चा झाल्या. prince आमच्यातीलच एका खुर्चीवर बसले व सर्वांशी गप्पा मारायला लागले. वातावरण हळू हळू नरमू लागले. दोन भारतीय, ते पण डॉक्टर व सख्खे भाऊ आणि महाराष्ट्रातून आल्यामुळे त्यांना विशेष वाटले. सर्वांशी ओळख झाल्यावर त्यांनी सर्वांना संबोधून जे भाषण केले ते ऐकून अजून विशेष वाटले. त्यांच्या वयाच्या मानाने ते फारच mature वाटले. त्यांनी एकच गोष्ट भर देऊन सांगितली व ती म्हणजे safety बद्दल. स्पर्धा आपल्या जिवा पेक्षा मोठी नाही याची ते वारंवार जाणीव करुन देत होते. आमच्या safety साठी आयोजकांनी केलेल्या उपाय योजने बद्दल सर्व माहिती दिली. पण शेवटी स्पर्धकाच्या हातात सर्व काही असते याची आठवण करुन दिली. आम्ही दोघा भावांना डोंगराची सवय नसल्यामुळे विशेष काळजी घेण्यास सांगितले. रस्त्याची पहाणी करण्यासाठी ते स्वत: कालपासून सायकलवर थिम्पुहून इथे जाकर ला आले होते व नुकतेच पोहचले होते. हे ऐकल्यावर आम्हाला आश्‍चर्यच वाटले व त्यांच्या पायाला असलेल्या चिखलाचा उलगडा झाला.Prince चा साधेपणा व सर्वांच्या safety ची काळजी पाहून आम्हांला विशेष वाटले. सर्व थरातील लोकल भुतानी स्पर्धकांशी व विदेशी पाहुण्यांशी हस्तांदोलन करण्यात, चर्चा करण्यात त्यांना कुठलाही राजेशाही थाट आडवा येत नव्हता हे विशेष.  चहापाना नंतर सर्व स्पर्धकांना नंबर टॅग देण्यात आले व स्पर्धेचे खास टी शर्ट देण्यात आले. सर्वांना १ सप्टेंबर ला सकाळी १ वाजता जाकर गावातील चौकात रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले.

       आम्ही मीटींग संपवून रूमवर पोहचलो. आता आम्हा रेसच्या रूटची ब-यापैकी माहिती झाली होती. त्या माहितीवरुन आम्ही तयार केलेला map  परत परत वाचू लागलो. जणू उद्या परीक्षाच आहे असे वाटू लागले. परीक्षाच होती मुळी. शेवटी एक लक्षात आले की आपल्याला वेळेत स्पर्धा संपवायची असेल तर सुरवाती पासूनच स्वत:च्या  च्या performance च्या peak वर रहावे लागणार. एक सेकंदाची उसंत घेणे परवडणारे नव्हते. आणि हे सर्व १६ ते १७ तासmaintain करावे लागणार होते. शिवाय आतापर्यंत सर्व स्पर्धकांची ओळख झाली होती. एकुण ४५ पैंकी आम्ही दोघेच भारतीय होतो. नेपाळचे नंबर एक आणि दोन असलेले स्पर्धक आलेले होते.U.K. वरुन दोन, तर पाच ते सहा German स्पर्धक होते, ज्यांचे वास्तव्य गेल्या दोन वर्षा पासून भुतान मध्येच होते. शिवाय १८-२० लोकल भुतानी स्पर्धक होते. त्यांची बातच काही और होती. सर्व वयाच्या विशीत होते. त्यातील काहींनी हा रूट सराव म्हणून ६ ते ७ वेळा केलेला होता. या सर्व भाऊ गर्दीत 'मै कहॉं आ गया यार असे सहज वाटून गेले. पण म्हणतात ना, खाजेला खाजवल्या शिवाय भागत नाही, त्यातलीच आमची गत होती.

       आजची संध्याकाळ व उद्याचा दिवस आमच्याकडे राहिला होता. संध्याकाळ आम्ही स्पर्धेसाठी लागणा-या सर्व गोष्टी व्यवस्थित लावण्यात घालवली. फक्त एकाच बाटलीच्या भरवश्यावर सायकलिंग करावे हे काही आम्हांला पटत नव्हते. शिवाय सायकल चालवतांना बाटली खालच्या bottle holder मधून काढायची व पाणी पिऊन परत ठेवायची, असे करण्यात सायकलीवरून पडण्याची भीती होती आणि प्रत्येक feed zone वर बाटली भरावी लागणार होती. ह्यात आम्ही कमी पाणी पिण्याची व dehydrate होऊन लवकर exhaust  होण्याची शक्यता जास्त होती. म्हणून आम्ही सवयी प्रमाणे पाठीवर २-३ लीटरची पाण्याची कॅमल बॅग घ्यायचे ठरवले.exhaust होण्यापेक्षा ३-४ किलो वजन घेऊन सायकल चालवण्यास आम्ही प्राधान्य दिले. कॅमल बॅग चा फायदा म्हणजे फक्त दोन ते तीन वेळा रिफिलिंग लागणार, शिवाय सायकल चालवतांना पाणी पिणे सोपे असल्यामुळे dehydration चा धोका कमी. कॅमल बॅग मध्ये प्रत्येक रिफिलिंगला १ लीटर साधे पाणी व त्यात १ लीटर electrolyte solution मिसळण्याचे ठरवले. त्या प्रमाणे आम्ही आमची कॅमल बॅग भरुन ठेवली. शिवाय रस्त्यात रिफिलिंगसाठी ८ लीटर electrolyte solution च्या बाटल्या तयार करुन ठेवल्या. आता प्रश्‍न होता शरीरातील carbohydrate level maintain  करण्याचा. त्यासाठी आम्ही G.U. Energy जेल, जे की ३० ग्रॉम चे असते, त्यावर भर देण्याचे ठरविले. एक G. U. Energy जेल दर ४० मिनिटाला, या हिशेबाने २२ जेल चे पाकीट कमरेच्या pouch मध्ये ठेवले. शिवाय काही बदाम व काजू सुध्दा ठेवले. चव बदलण्यासाठी ते गरजेचे होते. रस्त्याला आयोजकांनी ठेवलेल्या feed zone वर केळी व चॉकलेटस् ची व्यवस्था करण्यात आली होतीच.

रेसच्या दरम्यान खाण्याची व पिण्याची तयारी झाल्यावर आमचा मोर्चा सायकलींकडे वळाला. परत चेन, ब्रेक, गियर, चेक केले. सोबत असण-या पंपाने हवा भरुन पाहिली, टूल किट व पंक्चर किट चेक केले. आयोजकांनी दिलेले नंबर प्लेट सायकलींना लावले. तेवढयात आमच्या लक्षात आले की आमच्या सायकलींना मड फ्लॅप नव्हती. बरेच जण सायकलचे वजन कमी करण्यासाठी ती काढून ठेवतात. मागच्याची तशी गरज नसते. चिखल उडाला तरी तो पाठीवरच उडतो पण पुढच्या चाकामुळे तोच चिखल डोळ्यातोंडात जाण्याची शक्यता होती. त्यात हे जर उतारावर घडले तर पडझड होऊ शकली असती. आता कोठून आणणार मड फ्लॅप, पण तेवढयात एका U.K. च्या स्पर्धकाने आम्हाला झकास आयडिया दिली. त्या प्रमाणे आम्ही mineral water च्या रिकाम्या बाटलीला चपटे करुन सायकलीच्या खालच्या तिरप्या दांड्यास बांधले. आयडिया फारच सुपीक ठरली. आमच्या तोंडावर चिखल येणार नाही एवढी खबरदारी नक्कीच झाली आणि सायकलींचे वजन पण नाही वाढले. त्या सायकली मनासारख्या तयार झाल्यावर अगदी standby म्हणून दोघांत मिळून घेतलेल्या extra  सायकली कडे आमचा मोर्चा वळवला. त्या स्टँडबाय सायकलची परिस्थिती वाईटच होती. तिची साईज १५ इंचच होती. शिवाय टायर टयूब जुनेच होते व ते पण २६×२.२ इंच म्हणजे थोडे मोठे टायर. याचाच अर्थ जास्त friction, व चालवण्यास जास्त ताकत लागते.  standby म्हणून आम्ही तिचे तेल पाणी केले व स्पर्धेच्या दरम्यान तिचा वापर करण्याची वेळ येऊ नये अशी देवाची मनोमन प्रार्थना केली.

       त्या दिवशी जेवण पण जेमतेमच केले. आता आम्हांला कुठलीही risk घ्यायची नव्हती. रेसच्या दरम्यान नंबर दोन ला जायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे जास्त energy देणारे, कमीvolume असलेले, व जास्त liquid असलेल्या खाण्यावर आम्ही भर द्यायचे ठरवले. शरीराला खूपexertion झाल्यास आपली पचनक्रिया शिथिल होते. त्यामुळे असे बदल करणे गरजेचे होत़े. रात्री कशीबशी झोप लागली. सकाळी उठायची घाई नव्हती.

       ३१- ऑगस्ट. आज तसे फारसे करण्यासारखे काहीही नव्हते. चहा नाष्टा झाल्यावर तेथील धार्मिक तळे व भुतान मधील सर्वात जुन्या देऊळाचे दर्शन घ्यायचे ठरवले. पुढील दोन तासांत दर्शन घेतले व रेस सुखरुप पूर्ण करता यावी या साठी प्रार्थना केली. दुपारचे जेवण झाल्यावर झोपण्याचा प्रयत्न केला. झोप काही येत नव्हती. पण आज रात्री १ वाजता रेससाठी रिपोर्टिंग असल्यामुळे बेड मध्ये फक्त पडून राहणे, व जमेल तेवढा शरीराला आराम देण्याचे ठरवले. संध्याकाळी उठून परत सायकल व सोबत घेण्याच्या खाण्यापिण्याच्या सामानाची परत तपासणी केली. जेवण केले. ते पण नीट जाईना. कदाचित anxiety मुळे असेल. कसेबसे जेवण आटपून परत रात्री १२ पर्यंत बिछान्यात पडून रहायचे ठरविले. मित्रांचे Best of Luck  साठी SMS व फोन येतच होते. आम्ही दोघे दिवे बंद करुन झोपण्याचा प्रयत्न करु लागलो. पण दोघांची बिछान्यात हालचाल चालूच होती. कदाचित दोघांच्या मनात सारख्याच विचारांचा कल्लोळ माजला होता. आपल्याला रेस पूर्ण करता येणार का? १६० की.मी. चा चढ व ११० की.मी. चा उतार आपण सुखरुप पार करणार का? मध्येच सायकलींना तर काही होणार नाही ना? या थंडीत साधे पंक्चर जोडायचे म्हटले तरी केवढा त्रास, शिवाय वेळ जाणार. आमच्या  calculation  प्रमाणे आमच्याकडे अर्धा तास सुध्दा extra नव्हता. शेवटपर्यंत आपल्या performance च्या peak वर सायकल चालवली तरच कशी बशी रेस वेळेत पूर्ण करता येणार होती. त्यात सायकल रिपेर करावी लागली तर रेस संपल्या सारखीच होती. गेल्या चार पाच महिन्यांची मेहनत, घालवलेला वेळ व पैसा, परिवाराच्या व मित्रमंडळींच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा याची आठवण झाली की अजून दडपण वाढायचे. परत स्वतःच मनाशी म्हणायचो- नाही असे काहीही होणार नाही. देव आपल्या पाठीशी आहे. मी नेहमी माझ्या मुलाला (ओमला) सांगायचो- God helps those who help themselves. आज या वाक्याची मला अत्यंत गरज होती. काहीही झाले तरी मी माझ्या प्रयत्नात कुठेही कसर सोडणार नव्हतो. रस्त्याची परिस्थिती बघता prince ने वारंवार safetyविषयी सांगितलेले पण आठवत होते.

शेवटी विचारांच्या गोंधळात १२ चा अलार्म वाजला तसे दोघेही ताडकन बेडच्या बाहेर आलो. व्यवस्थित नंबर २ ला होणे गरजेचे होते. नेमके अशा वेळेस होत नाही हाच अनुभव, पण या वेळेस दोनदा जाऊन थरमॉसच्या कॉफी चा मारा करुन, कसे बसे समाधानकारक काम पार पडले. सर्व काही आधीपासून लावून ठेवले होतेच. सायकलिंगचे कपडे चढवले.  safety ला महत्व देतknee cap  elbow guard घातले. हेल्मेट व थंडीचे जाकेट घातले. डोक्यावर हेडलॅम्प चढवले. तेवढ्यात आमच्या टूर गाईडचा आवाज आला. चिमी वांगचुक, अगदी आमच्या भुतान ट्रीपच्या सुरवातीपासून आतापर्यंत त्याच्या कलागुणांनी त्याने आमचे मन जिंकले होते. तो आता एक जवळचा मित्रच झाला होता. आमचा उत्साह बघून त्याला पण आता विश्‍वास वाटायला लागला होता. आम्ही तयार केलेल्या सर्व बाटल्या आम्हाला कशा पध्दतीने द्यायच्या हे त्याने समजावून घेतले. शिवाय आम्ही त्याच्याकडे एक extra सायकलिंगचा ड्रेस देऊन ठेवला. रुममध्ये शेवटची नजर फिरवून शेवटी आम्ही देवाचे नाव घेतले व आमच्या हॉटेल पासून दोन कि.मी. वर असलेल्या रेसच्या स्टार्टिंग पॉईटला निघालो.

१ सप्टेंबर, सकाळी १ ची वेळ, चौक अगदी भरलेला होता. सर्व स्पर्धक अगदी उत्साहात होते. सर्व जणू युध्दावर जाणा-या योद्ध्यांसारखे तयारीत आलेले होते. मनातले विचार आपोआप थांबले होते, जणू त्याचा पण आता कंटाळा आला होता. आता वेळ होती performance ची, आणि करुन दाखवण्याची. सर्व स्पर्धक आपापली सायकल चेक करत होते, व काही राहिले तर नाही याची खात्री करत होते.  आयोजक प्रत्येकाची सायकल दिलेल्या specification प्रमाणे आहे ना याची काळजी पूर्वक पहाणी करत होते व मगच O.K. चे sticker लावत होते. फक्त stickerलावलेलीच सायकल वापरता येणार होती. आम्ही पण आमच्या सायकली तपासून घेतल्या वsticker लावून घेतले. तिथेच चौकात थिम्पुचे अंतर व दिशा दाखवणारा फलक होता. थिम्पु २६८ कि. मी. त्याच्या खाली उभे राहून आम्ही दोघा भावांनी शेवटचा फोटो काढला. आयोजकांनी सँडविच व चहाची व्यवस्था केलेली होती. मला सँडविच काही गेले नाही पण मी चहा प्यालो. परत सायकलीचे दिवे व Head Lamp check  केला. आयोजकांनी ४५ स्पर्धकांसाठी २२ गाड्या ठेवल्या होत्या. त्या गाड्यांमध्ये प्रत्येक स्पर्धकाचे लागणारे सामान होते. त्याच गाडीत आयोजकांचा एक मार्शल बसणार होता. सर्व नियमात चालले ना? हे लक्ष ठेवण्याचे त्याचे काम.  शिवाय सायकल बदलावी लागली तर प्रथम त्याला हे पटणे गरजेचे होते की ती रिपेयर करण्याच्या पलीकडे आहे. आमच्या गाडीतील मार्शलची चिमीने आमची ओळख करुन दिली. चिमी पण थोडा भावूक झालेला वाटत होता. त्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या व जे वाक्य तो बोलला त्याने मला रेसची प्रचिती व त्याची आमच्या प्रती असलेली काळजी दाखवून दिली. तो म्हणाला - Doctor, this is not the only thing you will be doing in your life. यामुळे अति उत्साहात भलतीच रिस्क घ्यायची नाही हे आम्ही ठरवून टाकले.

१.३० वाजता सर्वांना लाईनीत उभे केले. सर्व स्पर्धक विशीतले, अगदी फिट व professionalवाटत होते. सर्वांजवळ सायकलिंगचा short dress, उच्च प्रतीची म्हणजे ट्रेक ८५०० सायकल व फक्त एक पाण्याची बाटली होती. त्या उलट आम्ही दोघे भाऊ सायकलिंगच्या फुल ड्रेस मध्ये. शिवाय knee cap  elbow guard घातलेले व पाठीवर पाण्याची camel pouch sack  होती. ते सर्वprofessional होते व त्यांचा प्रत्येकाचा पहिला येण्याचा व मागील वर्षाचा record break करण्याच मानस होता. त्या उलट आम्ही amateur, व हेतू एकच- आपल्याला वेळेत ही रेस पूर्ण करता आली पाहिजे, व ती पण सुखरुप, अगदी चिमीने सांगितल्या प्रमाणे. नंतर आम्हांला कळाले की बरेचजणांना आमच्या बद्दल कुतुहूल वाटत होते. तर काहींना ’ ये यहाँ कहाँ आ गये भाई’ असे पण वाटत होते. शेवटची २० मिनिटे राहिली. Prince स्वत: सायकल वर होते. शेवटच्या क्षणी सुध्दा शुभेच्छा देतांना त्यांनी परत safety वर भर दिला व सर्वाना काळजी घ्यायला सांगितले. १.३० ते २ वाजेच्या दरम्यान अर्धा तास आम्ही निदान ३ वेळा तरी नंबर १ ला जाऊन आलो असू, कदाचित anxiety मुळे. पण कोप-यात गेल्यावर दिसायचे की ही परिस्थिती फक्त आपलीच नाही तर ब-याच स्पर्धकांची होती. शेवटची १० मिनिटे. मी महेंद्रला मिठी मारली. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्याची practice चांगली झाली होती. मी त्याला माझी काळजी न करता full speed ने पुढे जाण्यास सांगितले. त्याची मला दोन गोष्टींमुळे काळजी वाटत होती. एक म्हणजे तो उतावळा आहे, त्यामुळे विशेष उतारावर त्याने जास्त काळजी घेणे गरजेचे होते असे मला वाटत होते. दुसरे म्हणजे त्याला कंटाळा फार लवकर येतो. शेवटी शेवटी त्याने क्षुल्लक कारणासाठी कंटाळा आला म्हणून रेस सोडू नये. या दोन्ही गोष्टींची त्याला काळजी घ्यायला सांगितले व शेवटी लढ! म्हणून शुभेच्छा दिल्या. शेवटचे १० सेकंद count down सुरु झाला १०,,,-------------१. बंदुकीतून गोळी सुटण्याचा आवाज झाला तसे सर्वजण त्या गोळी प्रमाणे सुसाट वेगाने सुटले.

अंधारात सर्वांच्या सायकलीचे दिवे व head lamp च्या दिव्यांचा प्रकाश घाटात सर्वत्र काजव्याप्रमाणे भासू लागला होता. लगेचच चढाईस सुरवात झाली होती. १० कि.मी. वर किकीला नावाचा पास होता. (ला म्हणजे pass किंवा खिंड). सर्वांनी तो १ तासात म्हणजे ३ वाजेच्या आत पार करणे बंधनकारक होते. सुरुवातीच्या जोमात ३०० मीटरचा तो चढ फार जाणवला नव्हता. आकाशात तुरळक ढग असल्यामुळे मधून मधून चंद्रप्रकाश येत होता. नशिबाने पौर्णिमाच होती. वातावरणात गारवा होता. म्हणून चढाई असून सुध्दा फार दमायला होत नव्हते. महेंद्र ब-यापैकी जोरात माझ्या पुढे होता. कीकीला मी ४० मिनिटांत म्हणजे २.४० लाच गाठला. तो पर्यंत बरेचसे स्पर्धक माझ्या पुढे गेले होते पण काही जण अजून मागे होते. त्यामानाने आपली कामगिरी बरी चाललीय असे वाटू लागले. कीकीला नंतर ४-५ की.मी चा थोडासा उतार होता व नंतर पुढील १५-२० की.मी चा ६-१० अंशाचा gradient असलेला म्हणजे थोडा अवघड श्रेणीचा चढ होता. आयोजकांच्या, मार्शलच्या गाडया आमच्या मागे पुढेच होत्या. मध्ये छोट्या छोट्या वाडया असल्यामुळे रस्त्यात ब-याच ठिकणी शेण होते. त्यातून गेल्यावर सायकल भरण्याची शक्यता असते. त्याहून कठीण म्हणजे रस्त्यात बसलेली गाय ब-याच वेळा शेवटच्या क्षणी दिसायची व धांदल उडायची. आपल्याकडे तिचे तोंड असल्यास ब-याच अंतरापासून तिचे डोळे चमकायचे. त्या अंधारात ते सुध्दा विचित्र वाटायचे. सर्व लक्ष सायकलवर केंद्रित होते. समोर फक्त २६० की.मी. वर असलेले थिम्पु शहर दिसत होते. २० कि.मी. चा सोपा चढ कधी संपला कळलेच नाही. पुढील २० कि. मी. चा अवघड श्रेणीचा (१५-२५ अंश gradient असलेला) चढ होता. हा चढ आम्हांलाYotangla pass (३४५०) मी. जो की संपूर्ण रूट मधील सर्वात उंच पास मध्ये घेऊन जाणारा होता. काही स्पर्धकांना मी मागे टाकत होतो तर काही मला मागे टाकत होते. या चढावर मी २-४ व २-३ गियर combination चा वापर करत होतो. सकाळचा ताजा दम असल्यामुळे पुढचा १ नंबरचा गियर टाकण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आपले स्नायू पूर्ण थकू नयेत याची पण मी काळजी घेत होतो. कारण एकदा का ते थकले तर पुढील १६ ते १७ तास सायकलिंग करता येणे शक्य नव्हते. असे करत अंधारातच योतांगला चढलो. रस्त्यातील स्तूप पाहून बरे वाटले. ठरल्याप्रमाणे सकाळी ५ वाजता मी योतांगला चढलो. सर्व ठरल्याप्रमाणे पार पडत होते म्हणून आत्मविश्‍वास वाढत होता. पण मनाच्या एक कोप-यात धाकधूक होतीच. योतांगला ला न थांबताच सरळ उतार उतरायचे ठरवले. पुढे सरळ ५० कि. मी. चा Trongsa पर्यंत व त्या पुढे बीजीझाम पर्यंत उतार होता. झाम म्हणजे नदीवरचा पूल, व आपण एखाद्या valley त उतरायला लागलो तर थेट नदी गाठतो हे सर्व हिमालयात फिरणा-यांना ठाऊकच आहे.

गेल्या २ स्पर्धेत ह्याच उतारावर बरेच अपघात घडलेले होते. म्हणून आम्हाला याची कल्पना देखील दिलेली होती. आयोजकांनी पण ह्या वेळेस जास्त गाड्या ठेवल्या होत्या. ४ तासानंतर आमच्या सर्वांच्या torches  डिम होत होत्या. त्यामळे जो स्पर्धक जोरात असेल त्याच्या मागे प्रकाशासाठी एक गाडी लागायची. उंची भरपूर होती. ५ वाजले तरी उजाडले नव्हते कारणTrongsa valley त पूर्ण ढग पसरले होते, व आम्ही अक्षरशः ढगांच्या वर होतो. मी घाट उतरण्यास सुरवातच केली होती. तेवढ्यात मला १०० मी. पुढे थोडी गर्दी दिसली व त्या गर्दीत महेंद्रच्या सायकलचा विशिष्ट कलर असल्यामुळे त्याचीच काहीतरी गोची झाल्याचे लक्षात आले. तेवढे १०० मी. अंतर पार करे पर्यंत असंख्य वाईट विचार माझ्या मनात डोकावून गेले. तिथे पोहचल्यावर कळाले की त्याच्या सायकलीची चेन अडकली आहे व ती काही केल्या निघत नव्हती. मला पहाताच तो म्हणाला, 'दादा सर्व ठीक आहे, तू नीघ.' हे ऐकून मला हायसे वाटले व मी उतार उतरण्यास सुरवात केली. सायकलींचे गियर जरा पटापटा बदलण्याची घाई केली तर चेन वरचा ताण झटकन कमी होतो व अशा परिस्थितीत चेन अडकण्याची शक्यता वाढते. आपण दमून चढ चढल्यावर फार हायसे वाटते व कधी एकदाचे सायकलचे वरचे गियर पाडून स्पीड पकडतो असे झालेले असते. महेंद्र साधारण ३० मिनिटे माझ्या पुढे होता म्हणजे तो ब-यापैकी जोरात चढला होता. आणि नेमके त्याच उत्साहात त्याने पटापट गियर बदले असणार. असो, जे व्हायचे ते झाले होते. सायकलची परिस्थिती पाहून मार्शल ने त्याला राखीव सायकल वापरण्याची परवानगी दिली होती. बरे झाले, आम्ही शेवटच्या क्षणी दोघांत का होईना पण राखीव सायकल घ्यायचा निर्णय घेतला होता. आता तिच्यामुळेच महेंद्रला रेस पूर्ण करता येणार होती. राखीव सायकलची परिस्थिती अजूनच बिकट होती. पण म्हणतात ना, वेळेला केळं नाही तर सिताफळं!

मी ३-४ कि.मी. उतरलो असेन तेवढ्यात महेंद्र त्याच्या राखीव सायकलीवर तेवढ्याच जोमाने मला ओलांडून निघूनही गेला. त्याचा उत्साह बघून फार बरे वाटले. उतार संपता संपत नव्हता. सर्वत्र ढग असल्यामुळे visibility फारच कमी होती. रस्त्याच्या एका बाजूला कपार व दुस-या बाजूला कठडा नसलेली दरी. काळजी घेणे फारच गरजेचे होते. काही कारणास्तव ब्रेक लागले नाहीतर १००० मी. खोल दरीत जाण्याची शक्यता होती. मागच्याने पाहिले तर ठीक, नाहीतर कोणाला कळणार पण नाही की आपण दरीत पडलो म्हणून. हा विचार जरी मनात आला तरी थरकाप उडायचा व आपोआपच ब्रेक लागून उताराची स्पीड कमी व्हायची. आमची सायकल आपोआपच रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायला लागायची. निदान पडलो तरी फार फार तर दगडावर आपटेन, व फार फार तर एखादे हाड मोडेन. दरीत पडण्यापेक्षा बरे. ५० कि.मी. चा उतार संपता संपत नव्हता. ब्रेक दाबून दाबून हातांना मुंग्या यायला लागल्या होत्या. शिवाय वार्‍यामुळे थंडी वाजायला लागली होती. जसे जसे आम्ही खाली उतरायला लागलो तसे ढग विरळ झाले व खाली Trongsa गावाचे दर्शन झाले. एव्हांना उजाडायला लागले होते. Trongsa गावातील स्पीड ब्रेकर, ज्याच्यावर गेल्या वर्षी एक स्पर्धक पडून जबडा मोडला होता, तो स्पीड ब्रेकर काळजी पूर्वक पार करुन बिजीझाम गाठले. बिजीझामची उंची अवघी १२०० मी. म्हणजे साधारण २८०० मी. आम्ही उतरलो होतो व ठरल्याप्रमाणे ६ वाजता बीजीझाम गाठले होते.

आता खरी कसरत होती, कारण पुढे ६२ की.मी. चा संपूर्ण चढ चढून पुढील खिंड म्हणजे पेलेला गाठायचा होता. सोबतच नको ते घडण्यास सुरवात झाली होती आणि ते म्हणजे पाऊस पडायला लागला होता. सकाळी ११ वाजेच्या आत पेलेला गाठायचे माझे ध्येय होते. जर ११ वाजता पेलेला चढू शकलो तरच पुढे १ तास ५० कि.मी पेलेला उतरण्यास लागणार होता व मग हातात ६ तास मिळणार होते, सर्वात अवघड असा ६० कि.मी. चा आणि ३३०० मी उंचीचा Dochula passचढण्याकरिता. आम्हाला संध्याकाळी  ६ च्या आत Dochula pass  चढणे नियमाने अनिवार्य होते. आणि तीच काळजी मला सतावत होती. पण आता पर्यंत सर्व ठरल्या प्रमाणे घडत होते. मी पेलेलाच्या दिशेने धपाधप पेंडल मारण्यास सुरवात केली. ६ कि.मी. वर दुसरा feed zone होता. तो  Trongsa view point  वर. तिथे पोहचता पोहचता मला ७ वाजले. सकाळी २ वाजता सुरुवात केल्यापासून आता ५ तासानंतर ह्या feed zone ला सायकलवरुन उतरायचे ठरवले. आमचा चिमी होताच. सर्व volunteers तत्परतेने केळी सोलून देत होते व चॉकलेट बारचे wrapper काढून देत होते. चिमी ने माझ्या camel pouch मध्ये १ बाटली साधे पाणी व १ बाटली त्याला आधीच भरुन दिलेले electrolyte solution टाकेपर्यंत मी २-३ केळी व ५ चॉकलेट फस्त केले व लगेच सायकलला टांग मारली. महेंद्र माझ्या पुढेच होता. मला सायकलवर निघालेले बघून चिमीने लागलीच माझा निरोप घेतला व पुढे जाऊन महेंद्रची मदत करुन पुढच्या feed zone वर  तुमची वाट बघतो असे म्हणाला. कोण कोणाचा म्हणून चिमी ही सर्व धावपळ करत होता, माहीत नाही,पण गेल्या आठ दिवसात त्याच्यात व आमच्यात एक वेगळेच नाते तयार झाले होते. तो आम्हाला सारखेच म्हणायचा, तुम्ही डॉक्टर असून इतक्या लांबून या स्पर्धेत भाग घेण्यास आलात व मी इथला असून सुध्दा एकदा पण ह्या स्पर्धेत भाग घेतला नाही.  ह्यामुळे त्याला आमचे जास्त कौतुक. त्याचा पण आम्हाला खूप मोठा आधार. दुस-या देशात जणू तो आपलाच माणूस, घरुन आपल्या सोबत आला असल्याचे आम्हाला भासत होते. *

*Editorial Note:

Great poet Bhavabhooti says:

व्यतिषजति पदार्थान्  आंतरः कोsपि हेतुः। न खलु बहिरुपाधिः प्रीतयः संश्रयन्ते ॥

विकसति पतंगस्योदये पुंडरीकः। द्रवति च हिमरश्मौ उद्गते चंद्रकांतः ॥

(Objects are bound to each other by some hidden internal force . Affection is not the result of some externally apparent factor. Lo! The sun rises and the lotus blooms. The moon rises and the Chandrakant gem starts melting.)

एव्हाना पावसाने चांगलाच जोर धरला होता. विंडचीटर घालून सुध्दा सर्व अंग ओले झाले होते. रस्ता चढाईचा असल्यामुळे थंडी जाणवत नव्हती. पण पुढे असाच पाऊस चालू राहिला तर त्याचा त्रास होण्याची भीती वाटू लागली होती. ह्या ६२ की.मी. च्या पेलेला पास सर करण्याच्या चढाईत शेवटचे २० कि.मी. अगदी जास्त gradient चे होते. त्याची सुध्दा काळजी वाटत होती पण सर्व ठरल्याप्रमाणे वेळेत होत होते म्हणून बरे वाटत होते. ह्याच दरम्यान वाटेत १ ते १.५ तास स्वत:prince ने माझ्या सोबत सायकल चालवली. बरीच चर्चा देखील केली. जणू आम्ही या स्पर्धत काय म्हणून आलो याचे उत्तर ते शोधत होते. सायकलींचा सराव कसा करतात याची चौकशी करत होते. या आधी आम्ही कुठे अशा स्पर्धेत भाग घेतला होता का, या बद्दल विचारत होते. अर्थात आमची ही पहिलीच वेळ होती या प्रकारच्या स्पर्धत भाग घेण्याची. शिवाय आमच्याकडे सलग ६० ते ७० कि. मी. चा चढ सरावासाठी कुठेही नाही हे सांगितल्यावर त्याचे त्यांना अप्रूप वाटले. शेवटी परत saftey ला मान देण्याविषयी व स्वतःची काळजी घेण्याची सूचना देत ते गाडीत बसून दुस-या स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यास पुढे गेले. साधारण सकाळचे ९.३० वाजत आले होते, अजून पेलेला पास साठी अंदाजे १५ ते १६ कि.मी. अंतर शिल्लक असावे. थोडे दमायला व्हायला लागले होते. जस जसे ३२०० मी. वर पोहचलो तशी थंडी पण जाणवायला लागली होती. पावसाचा जोर काही कमी होण्याचे नाव घेत नव्हता. माझ्या मागे पुढे कधीतरी कुठल्याशा वळणावर एखादा प्रतिस्पर्धी नजरेत पडायचा. माझी स्पर्धा वेळेशी असल्यामुळे मला त्याचे सुख दु:ख नव्हते. मला एकच ठाऊक होते आणि ते म्हणजे संध्याकाळी सहा वाजे च्या आत Dochula pass सर करणे. Dochula पासून पुढील २० की.मी. थेट थिम्पु पर्यंत सलग उतार असल्यामुळे आपण वेळेत Dochula सर केला म्हणजे रेस संपल्यात जमा होती. या विचाराने परत भानावर आलो. ढगांमुळे आपण पेलेला पास पासू किती दूर आहोत हे कळत नव्हते.Milestone तर नावालाच कधी तरी दिसायचे. देवाचे नाव घेत पटापट पेंडल मारायला लागलो. १० वाजून ३० मिनिटे झाली होती. ११ वाजेच्या आत पेलेला पार करणे गरजेचे होते. थोडे टेंशन यायला लागले होते. अजून १५ मिनिटे चढतो न चढतो तोच शेवटचे वळण आले आणि पुढे ढगात पेलेला वरच्या स्तुपा चे दर्शन झाले. भर पावसात बिचारा आमचा मार्शल व चिमी माझी वाट पहातच होते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे महेंद्र ४० मिनिटांपूर्वीच पुढे गेला होता. महेंद्र बद्दल ऐकून मला फार बरे वाटले.

Trongsa view point  च्या feed zone वर सायकलवर जे बसलो होतो ते आताच पेलेला ला खाली उतरलो. १०.४५ लाच पेलेला वर पोहचल्यामुळे थोडे बरे वाटत होते. म्हणजेच ६२ की.मी., २००० मी. उंचीचा रस्ता मी ३ तास ४५ मिनिटांत पार केला होता. सायकलवरुन खाली उतरल्या उतरल्या अचानक थंडी वाजू लागली. चिमीच्या सल्ल्यानुसार ओले शर्ट काढून पटकन कोरडे शर्ट घातले व वरुन परत विंडचीटर चढवले. त्याने सुध्दा हुडहुडी थांबायचे नाव घेत नव्हती. इथे पण चिमीने माझ्या  camel pouch मध्ये १ ली. साध्या पाण्याची व १ लिटर electrolyte solution ची बाटली ओतली व मी कसे बसे दोन केळी व १ चॉकलेट खाल्ले. सर्व काही ५ मिनिटांत आटोपून लगेच सायकलवर बसलो. पुढे साधारण ५० कि.मी. चा उतार होता. पण रस्ता अगदीच खराब होता. उजव्या बाजूला दरी तर होतीच पण डांबरीकरणाचे नामोनिशाण  नव्हते. सगळीकडे खड्डे,दगड माती होती. आमच्यासाठी बुलडोझरची कामे थांबली होती. खाली उतरतांना थंडी अधिकच वाढली. चढतांना निदान शरीरात उर्जा निर्माण होत असते आणि आपला स्पीड पण फार नसतो. या उलट उतरताना शरीरात उर्जा निर्माण होत नाही व स्पीड जास्त असल्यामुळे वारा पण खूप झोंबतो. पावसाचा जोर अगदी तसाच होता. शेवटी माझे सर्व अंग थरथरायला लागले. मला ब्रेक लावता येतील की नाही याची पण शंका यायला लागली होती. आपण जर असेच सायकल चालवत राहिलो तर पडणार हे नक्की. मी लागलीच खाली उतरलो. रस्त्यात खाली हात पाय हालवून शरिराला उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करु लागलो. 'देवा मला थोडे फार का होईना,ऊन दे' अशी प्रार्थना करु लागलो. उन्हाची शक्यता नव्हतीच.  आपल्याला कसा बसा हा उतार ही थंडी सहन करतच उतरायला लागणार हे उमजल्यावर तसेच पुन्हा सायकल वर स्वार झालो. वेळ हातातून निघत चालला होता. ब्रेक मारुन मारुन हाताला मुंग्या येत होत्या. शरीराची थरथर थांबायचे नाव घेत नव्हती. कधी एकदाचा उतार संपतो असे झाले होते. आजूबाजूला कोणीही नजरेस पडत नव्हते. आमची गाडी पुढे महेंद्रला पाणी देण्यासाठी निघून गेली होती. असे वाटत होते की आपणच या स्पर्धेत एकटे राहिलो की काय. माझ्या मागे अजून स्पर्धक होते, पण त्यांची चाहूल लागत नव्हती.

कसेबसे मी Teki Gompa ला येऊन पोहोचलो. इथे हा उतार संपला. उंची कमी झाल्यामुळे थोडी थंडी पण कमी झाली होती. वस्ती व माणसे दिसायला लागली होती. उतारावर वेळ वाचवायचा सोडून थंडी मुळे व खराब रस्त्यामुळे माझा अर्धा तास जास्त गेला होता. ११.३० वाजता Teki Gompa ला पोहचण्याच्या ऐवजी दुपारचे १२.१० झाले होते. पुढील १२ की.मी. चा रस्ता एका लेवलचा होता. याला आम्ही रोलिंग रोड असे म्हणतो. पण ती जागा head on wind  म्हणजे समोरुन येणा-या वा-याची होती. परत उत्साह संचारायला लागला होता. वेळेचे टेंशन ही वाढत होते. खाली चिमी भेटला. ओले हातमोजे त्याला दिले. पाणी भरुन घेतले व जमेल तेवढ्या जोरात सायकल चालवू लागलो. सकाळी २ वाजे पासून दर ४० मि. ला G. U. Energy Gel खाऊन त्याची शिसारी यायला लागली होती. पण मसल्स (स्नायूंना) carbohydrate चा सतत पुरवठा ठेवणे गरजेचे होते. माझ्याकडे यापेक्षा चांगला पर्याय नव्हता. ४० मिनिटे झाली, की टाक एक G.U. Energy Gel  चे पाकीट तोंडात, व लगेच गीळ पाण्याने, असा माझा सायकल चालवतांना उपक्रम चालू होता. त्याची आठवण रहावी म्हणून मनगटाच्या घड्याळात दर तासाला अलार्म सेट करुन ठेवला होता. कसे बसे वांगडू फोदरांग गाठले. तेथून खरी गंमत सुरु होणार होती. तेथून पुढे ४६ कि.मी. चा अतिशय अवघड असा १५ ते २५ अंश  चा २००० मी उंचीचा चढ पार करायचा होता. आणि तोही संध्याकाळी सहाच्या आत. म्हणजे हातात ४ तास ४० मि. होती. दुपारी १ वाजून २० मि. झाले होते. आता पर्यंत मला सायकल वर ११ तास २० मि. झाले होते. व त्यात मी ३ पास आणि २०० कि.मी. चे अंतर पार केले होते. मागील २० कि.मी. मध्ये बर्‍याच जणांनी रेस सोडल्याचे दिसत होते. कारण त्यांच्या सायकली व ते गाडीने थिंम्पुच्या दिशेने जात होते.

अजूनही पुढील लक्ष्य अवघड पण शक्य वाटत  होते. जिद्दीने सायकल चालवायला लागलो. मनाशी उगाच आता फक्त ४ वेळा कसारा घाट किंवा १० वेळा अंजनेरीचा चढ चढायचा, किंवा एकKhardungla pass  सर करायचा अशी कल्पना करुन मनाची उमेद वाढवायचा प्रयत्न करु लागलो. महेंद्र साधारण अर्धा ते पाऊण तास माझ्या पुढे होता व तो वेळेत Dochula सर करुन जाईल याची मला एव्हांना जाणीव झाली होती, व त्याचा मला आनंद होत होता. लोबेतसा या गावालाfeed zone होता. मी तिथे परत पाणी भरुन घेतले व एक five star chocolate बार खाल्ला. चिमीने प्रोत्सान देऊन पुढे महेंद्रकडे जातो म्हणून माझा निरोप घेतला. हळूहळू चढाच्या वाढलेल्या gradient मुळे किंवा थकल्यामुळे माहीत नाही, पण २ - २/१ गियर वर सायकल चालवणे खूपच जड जात होते. शेवटी न राहवून १-३ व १-२ गियर वापरायला लागलो. ब-याच वळणांवर १-१ वापरावे लागत होते. रेस रूट मधला हा सर्वात रहदारीचा रस्ता होता. खूप वाहने दोन्ही दिशांनी धावत होती. जाता जाता चिमीने काळजीपूर्वक चालवायची आठवण करुन दिली होती. विशेष करुन समोरुन येणा-या वाहनांबद्दल कारण रस्ता ब-याच ठिकाणी खराब असल्यामुळे वहाने ब-याच वेळेला लेन सोडून उतरत होती. फारच काटकोनात वळणे असल्यामुळे अचानक वाहने समोरुन यायची, पण माझे लक्ष फक्त सहाच्या आत Dochula pass करणे येवढेच होते. मी पटापटा पेंडल मारण्याकडे सर्व लक्ष देत होतो. हा चढ आम्ही सरावाच्या दरम्यान सायकलीवर उतरल्यामुळे याची तशी मला कल्पना होती. साधारण एक तास झाल्यावर परतG.U. Gel घशात ओतले व पाणी पिऊन जोर लावायला लागलो. १-२ गियर वर सायकल चालवायला ही अवघड वाटत होते. १-१ वर जरा बरे वाटायचे पण स्पीड कमी व्हायचा. त्यामुळे काहीही झाले तरी १-२ आणि जमेल तेव्हा १-३ गियर वापरुन स्पीड मेंटेंन करायचा प्रयत्न करत होतो. रस्यात कुठेही Mile stone नव्हते.  आपण गेल्या एक तासात उरलेल्या ४६ पैकी किती किलोमीटर चढलो व आता किती बाकी आहे काही कळायला मार्ग नव्हता. रस्त्यावर कोणाला विचारले तर काहीही उत्तर मिळायचे. एक तर ब-याच जणांना हिंदी किंवा इंग्लिश येत नव्हते. तसेच रेटून सायकल चालवण्यास पर्याय नव्हता. माझ्या अंदाजाने १० चा स्पीड पडत होता म्हणजेच अजून ३६ कि. मी शिल्लक रहायला हवे होते.

हळू हळू शरीरातील ताकद कमी कमी होतांना जाणवत होती पण मन काही ऐकायला तयार नव्हते. १० चा स्पीड १२ चा कसा करता येईल याकडेच माझे लक्ष लागून होते. कारण ३६ कि. मी. अंतर व हातात जेम तेम ३ तास ३० मी. राहिली होती. मध्येच वाटायचे आपण असे चालवत राहिलो तर कदाचित ५.३० लाच Dochula पार करणार. पण असे सुध्दा वाटायचे की १०-१५ मिनीटा करिता उशीर नको व्हायला. पेलेला उतरण्यात थंडीमुळे व सर्व शरिरात हुडहुडी भरल्यामुळे लागलेला अर्धा तास जास्तीचा वेळ कदाचित महागात पडणार होता. सर्व विरुध्द विचार मनातून घालवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. मागून ज्या स्पर्धकांनी थकल्यामुळे व थंडीमुळे रेस सोडली, त्यांची गाडी थिम्पूच्या दिशेने जातांना दिसायची. खिडकीतून हात काढून मला Best luck, keep it up म्हणायचे, पण त्यांना रिस्पांड करण्याकरिता मान हालवण्याची ताकत तेवढी राहिली होती. त्यांना पाहून एकदा असेही वाटून गेले की जाऊ द्या, मरु द्या! केले की २२० की.मी.! बस झाले. पण हा विचार मी पटकन मनातून काढून टाकला. असे बरेच विचार मनात येत होते. घड्याळाच्या काट्यांना जणू पायच फुटले होते. पटापट वेळ जात होता. एव्हाना ४.३० वाजले होते. किती अंतर आलो व किती उरलेय काही कळत नव्हते. कोणाला विचारण्याची सोय नव्हती. वरती पाहिले तर असे वाटायचे आताच असेल जवळ, कदाचित पुढच्या वळणावरDochula नजरेस पडेल पण वळणानंतर वळणे जात होती व Dochula  पास येण्याचे काही नाव घेत नव्हता. Dochula येण्याच्या आधी १० कि. मी. वर एक feed zone होता व तिथे चिमी माझी वाट पहात होता. तिथपर्यंत मी पोहोचलो नव्हतो. आणि घड्याळात ५ वाजून गेले होते. मनात आता भीतीही घर करु लागली होती. जमेल तितक्या जोरात पेंडल मारण्याचा प्रयत्न करत होतो. पाय जणू आपोआपच गोल गोल फिरत होते. आणि पुढच्याच टर्नला feed zone दिसला. पाठीवरच्या camel pouch चे पाणी संपत आले होते. अजून दहा कि.मी. राहिले होते व हातात ४० मिनिटे होती. पाणी भरण्याची गरज होती, पण माझ्याकडे तेवढी ३-४ मिनिटे पण नव्हती. आता G. U. Energy gel खाण्याची पण इच्छा नव्हती. चिमीला मी सायकल चालवता चालवता एक बाटली हातात देण्याचे सांगितले. व तसेच पाणी पिऊन bottle holder  ला ती बाटली लावली. सायकली वरुन खाली न उतरण्याचे दुसरे कारण म्हणजे, मला माहीत होते की आपण जर खाली उतरलो तर परत बसणे कदाचित जमणार नाही, व आता पायाचा गोल गोल पेंडल मारण्याचा मोसम तुटला तर cramp येण्याची शक्यता होती.  ४० मिनिटात १० कि. मी. जरा अशक्य वाटायला लागले होते. आमच्या गाडीतला मार्शल म्हणाला सुध्दा, " डॉक्टर तुम्ही सहाच्या आतDochula  ला पोहचणार नाही. ब-याच स्पर्धकांनी रेस सोडून दिली." मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व सर्व जोर सायकल चालवण्यात लावला. मनाशी निश्‍चय केला की काहीही झाले तरी ६ च्या आत सायकलवरुन खाली उतरायचे नाही. पायातील सर्व  slow/fast muscle fibres जणू दिसायला लागले होते.

डोळ्यांसमोर सर्व काही फ्लॅश बॅक सारखे फिरायला लागले. गेले चार पाच महिन्यांची practice,त्या मुंबई वा-या, ती भर पावसातील सायकलिंग, ते ओळखीचे झालेले धाबेवाले व त्यांच्या चेहर्‍यावरचे कुतुहूल आठवायला लागले. गेले चार पाच महिने आपण मुलांना, अंजनाला कुठल्याच रविवारी लाँग ड्राईव्ह तर सोडाच पण संध्याकाळी जेवायला सुध्दा बाहेर नेलेले नव्हते. हे सर्व आठवायला लागले. सर्व मित्र मंडळी, ज्यांनी आपल्याला मनापासून शुभेच्छा दिल्या व शेवट पर्यंत आपला track ठेवून होते त्यांचा चेहरा आठवायला लागला. इतकेच काय ज्यांनी आम्हाला भाड्याच्या सायकली जमेल तेवढ्या चांगल्या करुन दिल्या त्या मुलांचा best of luck चा निरोप आठवायला लागला.  काहीही नाते नसतांना चिमीने व आमच्या गाडीच्या ड्रायव्हरने घेतलेले कष्ट आठवायला लागले. हे सर्व मी असे कसे वाया जाऊ देणार होतो? मी अजून जोर जोरात पेंडल मारायला लागलो. मध्येच उभे राहून सायकल चालवायचा प्रयत्न करु लागलो. ६ वाजायला १५ मिनिटे राहिली होती. भुतान ऑलिम्पिक कमिटीच्या आयोजकांची बॅकप व्हॅन नजरेस पडली आणि माझे heart beats वाढायला लागले. जणू कधी सहा वाजतात आणि कधी याला गाडीत घालतो याचीच ते वाट पहात होते. किती अंतर राहिले काही कळत नव्हते पण माझ्या अंदाजाने ५-६ कि. मी. राहिले असणार कारण शेवटचा स्तूप नजरेस पडायला लागला होता. आता आपल्याला ३-४ कि.मी. साठी वेळेत रेस पूर्ण करता येणार नाही हे कळून चुकले होते. माझ्या मागे अजून एक स्पर्धक होता आम्हा दोघां शिवाय कुणीही दिसत नव्हते. एकतर बरेच जणDochula पास पार करुन गेले होते किंवा आधीच रेस सोडून गाडीत निघून गेले होते. एक विचार असाही मनात येऊन गेला की, खराब वातावरणामुळे आयोजकांनी १५ मिनिटांचा ग्रेस पिरीयड दिला तर किती बरे होईल. पण हा काही पोरखेळ नव्हता. भुतान ऑलिम्पिक कमिटीने आयोजित केलेली एक ओपन स्पर्धा होती, जिला जगातील लोक death race म्हणून संबोधितात. आणि नियम ते नियम असतात व ते सर्वाना सारखेच. मलाही, ग्रेस पिरीयडमुळे रेस वेळेत पूर्ण करता आली असे आवडले नसते. रेस मार्शल व Back up van  माझ्या मागे चालू लागली. मी काही सायकल वरुन खाली उतरण्याचे नाव घेत नव्हतो. शेवटची १० मिनिटे राहिली होती. व ५-६ कि.मी. चे अंतर असणार. मी शेवटचा उपाय म्हणून पाठी वरची बॅग खाली फेकून दिली. तेवढेच २ ते ३ किलो वजन कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न. जमेल तेवढे जोर जोरात पेंडल मारायला लागलो. शेवटी २-२.५ की.मी. गेलो असेन तसे घड्याळात सहा वाजले व रेस मार्शल माझ्या जवळ येऊन 'It's, time up, doctor' असे उद्‍गारला हे ऐकल्या ऐकल्या मला रडू आवरेना. रस्त्यावर बसून ढसा ढसा रडलो. सकाळी २ वाजे पासून खूप प्रयत्न केले होते शेवटी १५ मिनिटांसाठी वेळेत रेस पूर्ण करता येणार नाही म्हणून खूप वाईट वाटत होते. आयुष्यात या आधी कधीच स्वत:ला मानसिक रित्या व शारीरिक रित्या एवढे stretch केले नसणार. फक्त प्रामाणिक प्रयत्न केल्याचे समाधान होते. उरलेला २० कि.मी. चा उतार उतरणे एक औपचारिकता होती. महेंद्र वेळेत रेस पूर्ण करु शकल्याचे समाधान होते. हे माझ्या आयुष्यातील सर्वांत लहान १६ तास होते. घड्याळही इतक्या जोरात पळू शकते याची प्रचिती आली. असे वाटत होते की आता तर रेसला सुरुवात झाली. इतक्या भुर्‍कन् १६ तास उडून जातील याच्यावर विश्वासच बसत नव्हता.

       मला रडतांना बघून चिमीला काहीच कळेना. तो मला म्हणाला, 'Doctor, you should be proud of yourself.' अर्ध्याच्यावर स्पर्धकांनी तर कधीच थंडीमुळे रेस सोडली आहे. इथपर्यंत पोहचणारे ४५ पैंकी तुम्ही १७ वे व माझ्या लगेच मागे असलेला १८ वा स्पर्धक होता. फक्त १६ स्पर्धक वेळेत रेस पूर्ण करु शकले होते. जणू हे सांगून तो माझी समजूत घालत होता. त्याच्या या वाक्यांमुळे मला जरा बरेही वाटले पण अजून त्या दुःखातून सावरता येत नव्हते. एका क्षणापूर्वी जोरात सायकल चालवायची ताकत जणू नाहीशी झाली होती. आता साधे सायकल धरुन रस्त्यावर उभे रहायला पण पाय साथ देत नव्हते. रेसला यायच्या चार आठवड्यांपूर्वी मी कसारा उतरतांना पडलो होते. हाताला बरेच खरचटले होते व उजव्या गुडघ्याला तीन टाके पडले होते. त्यामुळे शेवटचे ४ रविवार नीट प्रॅक्टिस करता आली नव्हती. जखम लवकर सुकावी म्हणून आतापर्यंत आंघोळ करतांना गुडघा कोरडा ठेवत होतो. शिवाय गेले ५ दिवस स्वच्छ असणारे भुतानचे वातावरण आजच धो धो कोसळत होते. ही सर्व सांगायला कारणे झाली, पण एका स्पोर्टस्‍‍मन ला शोभत नाहीत. आज मला वेळेत रेस न पूर्ण करता येणे हेच सत्य होते व ते मला मान्य करावेच लागणार होते. आणि अशीच अपयशे पचवायला आम्हाला याच सह्याद्रीच्या व हिमालयाच्या द-या खो-यांनी ट्रेकिंग व सायकलिंग करतांना शिकवले. ६ वाजून २७ मिनिटांनी महेंद्र थिम्पुतील clock tower चौकात म्हणजेच finish line ला पोहचला होता. सात वाजता बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम होता. आम्ही दोघे भाऊ चिखलाने माखलेलो होतो. जवळच्या एक हॉटेल मध्ये पटापट अंघोळ केली व कपडे बदलून कार्यक्रमाला हजर झालो. एवढे समाधान नक्कीच होते की संपूर्ण भारतातून, या आंतरराष्ट्रीय खुल्या गटाच्या 'डेथ रेस' म्हणून संबोधिले जाणार्‍या स्पर्धेत भाग घेणारे प्रथम भारतीय नागरिक झालो होतो. कार्यक्रमाच्या दरम्यान फक्त पहिल्या १० स्पर्धकांना स्टेजवर बोलावून सर्टिफिकेट देण्यात आले. सोनम नामग्याल याने गेल्या वर्षीचा ११.३० मिनिटांचा रेकॉर्ड ब्रेक करुन फक्त ११ तासात ही रेस पूर्ण केली. त्याला १ लाखाचे बक्षीस देण्यात आले. दुसरा आलेला स्पर्धक हा टूर ऑफ ड्रॅगन पहिल्या रेसचा विजेता होता. तर तिसरा आलेला स्पर्धक हा भुतानचा opposition minister होता. politician चे हे वेगळे रुप पाहून अप्रूप वाटले. लगेचच भुतानच्या prince सोबत dinner होते. त्या दरम्यान prince ने आम्हा दोघा भावांचे विशेष कौतुक केले. तुम्ही ही रेस पूर्ण कराल असे मला अजिबात वाटले नाही असे प्रामाणिकपणे सांगून पुढच्या वर्षी परत येण्याचे आमंत्रण दिले. डिनरच्या दरम्यान रेस पूर्ण केलेल्या बाकीच्या स्पर्धकांना certificate देण्यात आले. एकुण १६ जणांनी ही रेस वेळेत पूर्ण केली होती व त्यात महेंद्र १५ वा होता. त्याला यासाठी १६ तास २७ मि. लागली होती. सर्व स्पर्धक थकलेले होते पण त्याच बरोबर एकमेकांना जाणून घेण्याची उत्सुकता पण होतीच. एकमेकांचे कौतुक करुन prince चे व आयोजकांचे उत्कृष्ट आयोजना बद्दल आभार मानून आम्ही सर्वांचा निरोप घेतला.

रुमवर गेल्यावर बिछान्यात पडल्या पडल्या झोप लागेल असे वाटले होते पण उलटेच झाले. आधीच खूप थकल्यामुळे नीट जेवण गेले नव्हते. आता गोळी खाऊनही अंग दुखी थांबायचे नाव घेत नव्हती. झोप तर लांबच राहिली. सारखी position बदलून दोघेही बिछान्यात आराम शोधण्याचा प्रयत्न करत होतो. १७ तास सायकल चालवतांना न जाणवलेल्या सर्व वेदना आता जाणवत होत्या. घरी रविवारी लांब सायकल चालवून आल्यावर मदतीला व काही हवे असल्यास द्यायला बायको असायची. ओम तर स्ट्रेचिंग पण करुन द्यायचा व पूर्ण अंग तुडवून द्यायचा. त्यांची फार आठवण येत होती. ह्या सर्व विचारात कधी डोळा लागला कळलेच नाही.

दुस-या दिवशी उशीराच उठलो. चहा नाष्टा केल्यावर पहिले काम होते ते म्हणजे सायकली परत करण्याचे. ठरल्याप्रमाणे चिमी आला व आम्ही तिन्ही सायकली परत करण्याचे सर्व सोपस्कार पार पाडले. आमच्या खर्चाने लावलेले नवीन टायर ट्यूब परत घेतले. व सर्वाचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला. आज बाकी काही करण्यासारखे नव्हते. दुपारच्या जेवणासाठी चिमी आम्हाला खास restaurant मध्ये घेऊन गेला. त्याला व आमच्या driver  नामग्याल ला आम्ही झकास पार्टी दिली व त्यांचे पण मनापासून आभार मानले. त्यांच्या मदती शिवाय आम्हाला ही रेस फार अवघड गेली असती किंबहुना अशक्य झाली असती. संध्याकाळी थोडाफार बाजारात फेरफटका मारला. दुस-या दिवशी सकाळी ५ वाजताच विमानतळावर जायचे होते. आता घराचे वेध लागले होते. तसे फोनवर बोलणे झाले होते, पण कधी एकदाचे घरी पोहचतो असे झाले होते. परत त्या रात्री पण नीट झोप आली नाही. थकवा जरा कमी झाला होता. भूकही लागायला सुरवात झाली होती. सकाळी बरोबर ५ वाजता चिमी आला. आम्ही तयारच होतो. तसेच पारोचे विमानतळ गाठले. चिमीचा व नामग्याल चा शेवटचा निरोप घेतांना थोडे गहिंवरुन आले होते. गेली १० दिवस त्यांनी आम्हाला इत्थंभुत्  भुतान दाखवले होते. त्यांना नाशिकला येण्याचे निमंत्रण देऊन आम्ही विमानतळाच्या दिशेने पाऊल उचलले. 

This little saga reminds one of Hemingway's  "The Old Man and the Sea", wherein the old man puts in Herculean efforts to catch the fish, only to lose it; or the immortal story of Scott losing the 'death race' to South Pole to Amundsen, and losing his life as well on the return journey. Such sagas are not essentially about winning or losing, but are tributes to the Indomitable Spirit of Man. - Ravi Shivde